राजगुरूनगर येथे ‘आशा’ स्वयंसेविकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
राजगुरूनगर | सह्याद्री लाइव्ह | ‘कोरोना संकटात ‘आशा’ स्वयंसेविकांनी प्रशंसनीय काम केले. संकटाशी मुकाबला करणाऱ्या याच खऱ्या गावोगावच्या रणरागिणी आहेत. या रणरागिनींसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे हे प्रशिक्षण नक्कीच लाभदायी ठरेल,’ असा विश्वास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे प्रशिक्षक डॉ.दीपक नायडू यांनी राजगुरूनगर येथे ‘आशा’ स्वयंसेविकाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात व्यक्त केला.
राजगुरूनगर येथे जिल्ह्यातील ‘आशा’ स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीबाबत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर शुक्रवारी (ता.14) पार पडले. लोकमान्य मेडिकल फाउंडेशन, पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते.
लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटरचे महाव्यवस्थापक डॉ.जयंत श्रीखंडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र शिंदे, सचिव किरण खुडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.बी.अदाते, लोकमान्य मेडिकल रीसर्चचे संचालक श्रीनिवास सत्तार, फाउंडेशनचे सीईओ डॉ.विशाल क्षीरसागर, उपसंचालिका डॉ.लिना राजन, पत्रकार नाजिम इनामदार, राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा, सहदेव गोळे उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात डॉ.जयंत श्रीखंडे यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
दृकश्राव्य माध्यमातून चित्रफित दाखवून ‘आशा’ स्वयंसेविकांशी संवाद साधला व आपत्ती काळात प्रथम काय करायचे, प्राधान्य कशाला द्यायचे, संकटग्रस्ताला सर्वप्रथम कोणती मदत पुरवायला हवी, याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात डॉ.विवेक नायडू व सहकाऱ्यांनी आपतीग्रस्ताला मानसिक आधार, पुनर्निर्माण, आग्निशमन, आपत्तीग्रस्तांचे विमोचन, समुपदेशन याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबिरासाठी ‘आशा’ स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी सुवर्णा वाघ, निखिल वडगव्हाळे, मच्छिंद्र डींगळे, राहुल पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीनिवास सत्तार यांनी केले. सूत्रसंचालन सहदेव गोळे यांनी केले. डॉ.विशाल क्षीरसागर यांनी आभार मानले.