डिजिटल अंगणवाड्या व इतर पायाभूत सुविधा सर्वदूर उभारणार – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
अमरावती : बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी अधिक सक्षम व अद्ययावत करण्यासाठी डिजिटल अंगणवाडी प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती तालुक्यात पाच डिजिटल अंगणवाडी निर्माण होणार असून जिल्ह्यातही ठिकठिकाणी डिजिटल अंगणवाड्या निर्माण होतील, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
जिल्ह्यात दीड कोटी रुपयांहुन अधिक निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावली शहीद येथे १५ लक्ष निधीतून बसस्थानक ते जन्मस्थान मार्गाचे काँक्रीटीकरण व १५ लक्ष निधीतून एमआरजीईएस अंतर्गत डिजिटल अंगणवाडीचा कामाचे,तसेच देवरी येथे ९ लक्ष रुपये निधीतून काँक्रीट रस्ता, पुसदा येथे ८ लक्ष निधीतून काँक्रीट रस्ता,नांदुरा किरकटे येथे १० लक्ष निधीतून रस्ता काँक्रीटीकरण,८ लक्ष निधीतून नया अकोला येथे वलगाव चांदुर बाजार रस्त्यावरील रस्ता सुधारणा,वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १० लक्ष निधीतून चेंजिग रुमचे बांधकाम, ३० लक्ष निधीतून वाल कुंपण बांधकाम, १५ लक्ष पेव्हर ब्लॉक बसवणे, १० लक्ष निधीतून सिमेंट काँक्रीट नाली, त्याचप्रमाणे, रेवसा येथे २४ लक्ष निधीतून काँक्रीट रस्ते, वर्गखोली आदी कामांचे भूमिपूजन झाले.
पं. स. सभापती संगीताताई तायडे, जि प सदस्य अलकाताई देशमुख, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ठिकठिकाणी विकासकामाना चालना देण्यात आली आहे. आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. देवरी येथे उत्कृष्ट ग्रामपंचायत भवनही उभारण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. प्रशासनाने कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. कामांचा दर्जा व गुणवत्ता राखून कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले
यावली शहिद येथे १०० हून अधिक नागरिकांना घरकुल व पट्टेवाटपही करण्यात आले.