धनंजय चंद्रचुड देशाचे नवे सरन्यायाधीश
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड यांची निवड केली आहे. चंद्रचुड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश होणार आहेत. केंद्रीय कायदामंत्री किरण रिजीजू यांनी ट्विटरवरून तशी माहीती दिली आहे.
विद्यमान न्यायाधीश यु. यु. लळित हे ८ नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यानंतर ९ नोव्हेंबरला चंद्रचुड यांचा शपथविधी होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचुड यांचा सरन्यायाधीशपदाचा कालावधी ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा २ वर्षांचा असणार आहे.
सरन्यायाधीशाचा मुलगा सरन्यायाधीश होण्याची ही भारताच्या इतिहासातील पहीलीच वेळ आहे. सर्वाधिक काळ सरन्यायाधीश पद भुषवलेले न्यायमुर्ती यंशवंतराव चंद्रचुड यांचे धनंजय चंद्रचुड हे सुपुत्र आहेत. वडिलांच्या निवृत्तीनंतर २७ वर्षांनंतर मुलगा त्याच पदावर विराजमान होणार आहे.