उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकरी मंडळाकडून स्वागत
फुगडी खेळून कार्तिक वारीचा लुटला आनंद
पंढरपूर । सह्याद्री लाइव्ह। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकऱ्यांसोबत ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषावर ठेका धरून रंगत आणली. ज्ञानोबा-माऊली तुकारामाचा जयघोष सुरू असताना फडणवीस यांनी गळ्यात टाळ अडकावून वारकऱ्यांना साथ दिली. तर फडणवीस यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात फेर धरला.
…अन दोघांनीही घेतला फुगडीचा आनंद
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांना फुगडी खेळण्याचाही मोह आवरला नाही. दोघांनीही बालवारकऱ्यांसह इतर वारकऱ्यांसोबत फुगडी खेळून कार्तिकी वारीचा आनंद साजरा केला.
यावेळी आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले उपस्थित होते.