उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन वाहिली श्रद्धांजली
by
sahyadrilive
November 24, 2022 1:03 PM
नागपूर। सह्याद्री लाइव्ह। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील झिरो माईल्स परिसरातील गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.
अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी आजच्याच दिवशी 23 नोव्हेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. दरवर्षी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून गोवारी बांधव या ठिकाणी अभिवादन सोहळ्याला उपस्थित असतात. आज 28 वा गोवारी शहीद स्मृती दिवस आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दंत महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर शहीद स्मारकाला भेट दिली. स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन या दुर्घटनेत शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दटके, मोहन मते व अन्य मान्यवर उपस्थित होते.