ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : “ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांच्या निधनाने रंगभूमीवरील संगीत नाटकाच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार हरपला आहे. मूळचे गोव्याचे असलेल्या पंडित रामदास कामत यांनी लहानपणीपासून त्यांचे वडिल बंधू उपेंद्र कामत यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी, प्रभाकर कारेकर, भालचंद्र पेंढारकर यांच्या सोबत काम करत त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.
संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित रामदास कामत यांनी ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून संगीत रंगभूमीची अविरतपणे सेवा केली. त्यांच्या निधनाने संगीत आणि कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली वाहिली.