डेंग्यूचा पुणेकरांना “ताप’; रुग्णसंख्या महिनाभरात 400 वर
पुणे : गेल्या दोन महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून, सप्टेंबर मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबर महिन्यात 392 रुग आढळले असून, आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या 400 च्या जवळपास झाली आहे. याशिवाय चिकनगुनियाचीही साथ असून, जानेवारीपासून सुमारे 180 रुग्ण आढळले आहेत.
ज्यांच्या घरी तसेच परिसरात डेंग्यू डासांची उत्पत्ती झाल्याचे आढळले त्यांच्याकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने आतापर्यंत 1 लाख 69 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. तर जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत आरोग्य खात्याने 2191 जणांना डेंग्यू डासोत्पत्तीप्रकरणी नोटीस बजावली आहे. वारंवार नोटीस देऊनही त्या ठिकाणी डासोत्पत्ती झाल्याप्रकरणी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती महापालिकेचे साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
जूनमध्ये पावसाला सुरूवात झाल्यानंतर डासांची संख्या वाढायला सुरूवात होते. डासोत्पत्ती न होण्यासाठी पाणी साठू न देण्याची जबाबदारी नागरिकांची, संबंधित आस्थापनांची तसेच घरे आणि सोसायटयांची आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात डासोत्पत्ती होते. ती होऊ न देणे ही जबाबदारी संबंधित विकसक किंवा बिल्डरची आहे. तसेच सरकारी कार्यालये, खासगी रुग्णालये यांचीही जबाबदारी आहे. याआधी पोलीस स्टेशन, पीएमपी कार्यालये, डेपो, हॉस्पिटल येथे डेंग्यू डासांची उत्पत्ती आढल्याचे दिसून आले असून, त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
इतर विषाणुजन्य आजार आणि डेंग्यूचे रुग्ण यांच्यामध्ये सर्वसाधारणपणे लक्षणे सारखीच असल्याने त्यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले. मात्र, त्यांची डेंग्यूची चाचणी निगेटिव्ह दिसून येते. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची चाचणी निगेटिव्ह येते हा गैरसमज आहे. डेंग्यूवर वेळेवर उपचार करणे आवशक आहे.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा