नि:स्वार्थ कर्माच्या शिकवणीमुळेच लोकशाही टिकून – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश
पुणे : कर्म करत रहा फळाची अपेक्षा ठेवू नका. या गीतेतील शिकवणीमुळेच आज आपली लोकशाही टिकून आहे. अनेक देशातील लोकशाही कमकुवत बनत असताना आपली लोकशाही अधिक बळकट बनली. याचं कारण म्हणजे समाजातील अनेक कर्मवीरांनी लोकांसाठी नि:स्वार्थ भाव ठेवून केलेले कार्य होय, असं कार्य करणार्या व्यक्तींची ओळख ‘न्यू पाथफाइंडर’ पुस्तकात करून दिली आहे, असे उद्गार पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्रकार भवन येथे ग्रीन वर्ल्ड प्रकाशित ‘न्यू पाथफाइंडर’ पुस्तकाच्या प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना काढले.
‘न्यू पाथफाइंडर’ या पुस्तकाचे लेखक गौतम कोतवाल म्हणाले की, एक हजाराहून जास्त लोकांच्या यशोगाथा उलगडताना आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रबळ इच्छाशक्ती, कष्ट करण्याची ताकद, कामात सातत्य, स्मार्ट वर्क, सतत बदलाची तयारी हे गुण अंगी असणं गरजेचं आहे. अशा व्यक्ती आपल्या क्षेत्रात हमखास यश मिळवतात हा अनुभव आहे.
यावेळी आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक वेळा संघर्ष करावा लागतो. माणूस संघर्षातूनच घडतो. संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर यश तुमचंच असतं. ‘न्यू पाथफाईंडर पुस्तकातील लोकांनीही जीवनात हेच सूत्र अवलंबलं आहे. तर माइंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर म्हणाले यशस्वी होण्यासाठी मनाची मशागत गरजेची आहे.
गौतम कोतवाल यांनी लिहिलेल्या ‘न्यू पाथफाइंडर’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व पुरस्कार वितरण उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने रंगला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत येणार्या अडथळयांना दूर करत स्वतः चा मार्ग शोधणार्या 28 कर्तृत्ववान लोकांचा परिचय या पुस्तकात करून दिला आहे.
यावेळी बिझसोल इंडिरा सर्व्हिसेस प्रा. लि. चे अशोक नवाल यांना समाजभूषण, रश्मी ग्रीन लँडचे रश्मीकुमार अब्रोल यांना कृषीरत्न, आर्हम ग्रुपचे अध्यक्ष डॉ. शैलेशजी पगारीरा यांना शिक्षणरत्न, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजर कणेकर यांना उद्योगरत्न, निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायधिश दिलीप देशमुख यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘ग्रीन वर्ल्ड’ने आजपर्यंत 400 हून अधिक व्यक्तींच्या कार्यांचा गुणगौरव विविध पुरस्कारांनी केलेला आहे, तर एक हजाराहून जास्त लोकांच्या यशोगाथा पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या आहेत. कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनच्या सोनल कोतवाल, भरत भांबुरे यांनी केले होते.