विद्यार्थ्यांची बॅंक खाती उघडण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत
पुणे : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतील 47 दिवसांच्या आहार खर्चाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे (डीबीटी) विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. विद्यार्थ्यांची बॅंक खाती उघडण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 2021 च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना पोषण आहार खर्चाच्या रकमेइतके आर्थिक सहाय्य डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात हस्तांतरण करण्याचे निर्देश दिले आहेत. योजनेस पात्र लाभार्थ्यांचे आधार लिंक बॅंक खाते माहिती अद्ययावत करून ती प्राथमिक शिक्षण संचालनालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सद्य:स्थितीत अनुदान उपलब्धता व पात्र लाभार्थ्यांच्या बॅंक खात्याची जिल्ह्यांकडील संकलित माहितीच्या आधारे 50 टक्के अनुदान जिल्ह्यांना वितरीत झाले आहे. उर्वरित अनुदान पहिले 50 टक्के अनुदान विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केल्यानंतर व जिल्ह्यातील मागणीच्या प्रमाणात जिल्ह्यांना त्वरीत वितरीत करण्यात येणार आहे, असे शालेय पोषण आहार योजनेचे राज्य समनव्य अधिकारी देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.
डीबीटी अनुदान वर्ग करण्यामध्ये जिल्हास्तरावरून विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. याबाबत भविष्यात तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. डिबीटी लाभ वितरणाअंतर्गत यापूर्वी विद्यार्थी किंवा पालकांचे संयुक्त आधार लिंक बॅंक खाते उघडण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत.