जुन्नरमध्ये फुलतेय जिरेनियमची शेती
- एकरी चार ते पाच लाखापर्यंतचे मिळते उत्पादन : शेतकऱ्यांना फायदेशीर
जुन्नर – जिरेनियमची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर असून त्यापासून जास्तीत जास्त आर्थिक फायदा होत आहे. जुन्नर तालुक्यात शेतकरी जिरेनियमची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहे.
जिरेनियमची लागवड करण्यासाठी रोपासहीत एकरी एक लाखापर्यंत खर्च येतो. जिरेनियमचे रोप नर्सरीतून पाच रुपये दराने खरेदी करावे लागते. जिरेनियमची लागवड करण्यासाठी पाण्याची निचरा होणारी जमीन असावी लागते. जिरेनियमचे उत्पादनासाठी पाणी व खते कमी लागतात. उत्पादन वाढीसाठी जीवामृताचा जास्तीत जास्त वापर केला जातो. पिकास बुरशी व करपा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. जिरेनियमच्या वर्षातून चार ते पाच कापण्या केल्या जातात. पहिली कापणी साधारणपणे चार महिन्यानंतर केली जाते व त्यानंतरच्या तीन महिन्यानंतर केल्या जातात. पहिल्या कापणीसाठी जास्त खर्च येतो. जिरेनियमचे एकरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते. एक टना पासून एक किलो तेलाची निर्मिती होते. एक किलो तेलाला 12 ते 13 हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो.
जुन्नर तालुक्यात अनेक शेतकरी जिरेनियमची मोठ्या प्रमाणात लागवड करीत असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा होत आहे. काही शेतकऱ्यांनी जिरेनियमपासून तेल बनविण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी केली आहे. त्यामध्ये बॉयलर, कूलिंग टॉवर, कंडेन्सर व दोन टाक्यांचा उपयोग करून जिरेनियमपासून तेल तयार केले जाते. तयार झालेले तेल सुगंधी द्रव्य बनविणाऱ्या कंपन्यांना विक्री केले जाते. जिरेनियमपासून तेल तयार करण्यासाठी स्वतःची यंत्रणा असेल तर वार्षिक चार ते पाच लखापर्यंतचा आर्थिक फायदा होतो, अशी माहिती रांजणी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी शिवाजी वाघ आणि गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी शरद वायकर यांनी दिली.