क्रीडा संस्कृती जोपासा – ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील
खेड । सह्याद्री लाइव्ह । बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक तंदुरूस्ती जोपासण्याची गरज सर्वच वयोगटांमध्ये निर्माण झाली असून त्यासाठी समाजात क्रीडाविषयक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक क्रीडा संस्कृती जोपासून समाजाचे प्रबोधन करण्याचे आवाहन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी केले. ते हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते.
या वेळी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, प्रा. व्ही. बी. दौंडकर, डॉ. दिलीप मुळूक, प्रबंधक कैलास पाचारणे, डॉ. निशाद खांगटे, रवींद्र रोकडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी ५ कि.मी. तर विद्यार्थिनींसाठी ३ कि.मी. अशा दोन गटात झालेल्या या स्पर्धेत सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ॲड. देवेंद्रजी बुट्टे पाटील पुढे म्हणाले, की विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवताना जिद्द व सातत्य राखत उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे यांनी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना खेळाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
होलेवाडी बायपास हायवेवर घेण्यात आलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक ऋतिक इंगळे, द्वितीय क्रमांक सौरभ मुळूक, तृतीय क्रमांक मुळुक दत्ता यांचा तर विद्यार्थिनींमध्ये प्रथम क्रमांक ऐश्वर्या खळदकर, द्वितीय क्रमांक वैष्णवी राळे, तृतीय क्रमांक कोमल सावंत यांनी पटकवला. या सर्वांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. चांडोलीच्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयाच्या वतीने रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.