Crime : आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बेड्या; विमानाने शहरात येऊन करायचे घरफोडी
उत्तर प्रदेश येथील चोरट्यांना पुण्यात अटक; 6 लाख 37 हजाराचे 130 ग्रॅम सोने हस्तगत; वॉचमन नसलेल्या सोसायट्यांची करायचे रेकी
पुणे : उत्तर प्रदेश येथून विमानाने शहरात येवून घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय चोरांना युनिट 4 ने अटक केली. त्यांच्याकडून 6 लाख 37 हजाराचे 130 ग्रॅम सोने हस्तगत केले. परवेज शेर मोहंमद खान (43) व तस्लीम अरिफ समशुल खान (23) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगार शहरात ‘रेकी’ करून घरफोडीचे गुन्हे करित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लोहगाव येथून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत वॉचमन नसलेल्या सोसायट्यांची रेकी करून चोरी केल्याचे कबुल केले. दरम्यान, परवेज खान याचा विश्रांतवाडी परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे त्याला परिसराची माहिती होती.
2016 मध्ये त्याला एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटकही झाली होती. त्यानंतर शिक्षा भोगून तो पुन्हा उत्तर प्रदेशाला गेला होता. लॉकडाऊननंतर तो त्याच्या उत्तर प्रदेश येथील साथीदारांना घेऊन पुण्यात घरफोडी करू लागला. मागील महिन्यात त्याने विश्रांतवाडी परिसरात दोन घरफोड्या केल्या होत्या. गुन्हा केल्यानंतर काही तासातच तो पुन्हा उत्तर प्रदेशात विमानाने रवाना होत होता. यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह-आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख, राकेश खुणवे, संजय आढारी, प्रवीण भालचिम, विशाल शिर्के, दत्ता फुलसुंदर, अशोक शेलार, रमेश राठोड यांनी केली.
आरोपी वॉचमन नसल्येल्या सोसायटीमध्ये जाऊन कुलूप लावलेली घरे हेरायचे. कडी-कोयंडा काही मिनिटांत उचकटून ते घरात घुसून चोरी करायचे. यामुळे नागरिकांनी घराला ‘लॅचलॉक’ लावावे, जेणे करून चोरांना समजणार नाही की घरात माणसे आहेत की नाहीत.
– जयंत राजूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट-4