भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा
नागपूर : शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखल घेवून आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज झालेल्या विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. समितीकडे प्राप्त तक्रारींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
उपायुक्त (महसूल) मिलिंद साळवे, विभागीय सहनिबंधक शिल्पा कडू, जलसंपदा विभागाचे सहायक मुख्य अभियंता एस. एन. बोरले, अशासकीय सदस्य अब्दुल रफीक खान यांच्यासह विभागीय समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा वेळेत निपटारा होणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित विभागांनी तक्रारींच्या अनुषंगाने आवश्यक चौकशी, तपासणी करून त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल समितीला सादर करावा. तक्रारीमध्ये तथ्य असल्यास पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. जिल्हास्तरावर कार्यवाही होणे आवश्यक असलेली प्रकरणे जिल्हास्तरीय समितीकडे पाठवावीत. या तक्रारींचा लवकर निपटारा होण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने प्रयत्न करावेत. न्यायप्रविष्ठ अथवा न्यायालयाने निकाल दिलेली प्रकरणे नस्तीबध्द करावीत, अशा सूचना लवंगारे-वर्मा यांनी दिल्या.