मोशीतील कचरा डेपोला पुन्हा लागलेल्या आगीमागे कटकारस्थान
‘बायोमायनिंग’चा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न - अजित गव्हाणे
पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोला यापूर्वी लागलेल्या आगीमुळे संशय निर्माण झालेला असतानाच ‘बायोमायनिंग’चे काम सुरू असलेल्या ठिकाणी पुन्हा आग लागल्यामुळे या आगीमागे मोठे कटकारस्थान आहे. ‘बायोमायनिंग’चे कोणतेही काम न करता कोट्यवधी रुपयांची उलण्यात आलेली बिले आणि त्यातून भाजपच्या ठेकेदार व पदाधिकार्यांनी केलेला भ्रष्टाचार दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.
मोशीतील कचरा डेपोला दहा दिवसांपूर्वी मोठी आग लागली होती. या आगीची माहिती अग्निशामक दलाला देण्यास तब्बल पाच तासांचा उशीर केल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. यावरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आग लागली की लावली याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत अद्याप प्रशासकीय पातळीवर चौकशीबाबत कोणताही निर्णय आयुक्तांनी घेतलेला नसतानाच पुन्हा शनिवारी (दि. 16) मोशीतील कचरा डेपोला आग लागली आहे. आगीचा प्रकार घडल्यानंतर अजित गव्हाणे यांनी याबाबत पुन्हा संशय व्यक्त करत एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अवघ्या मोशी येथील कचरा डेपोला दहा दिवसांपूर्वी लावलेल्या आगीतून भाजपधार्जिन्या ठेकेदारांचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या आगीला दहा दिवस उलटत नाहीत तोच पुन्हा कचरा डेपोला आग लागल्याने संशय अधिकच बळावला आहे. ही आग बायोमायनिंगचे काम सुरू असलेल्या ठिकाणाजवळ लागली आहे. करोना कालावधीत कचरा डेपोमध्ये जे ठेकेदार कार्यरत होते त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. या कालावधीत केवळ करोडो रुपयांची बिले काढण्यात आली असून त्याद्वारे भाजपच्या पदाधिकार्यांची घरे भरण्यात आली आहेत.
आता हा घोटाळा उघड होऊ नये म्हणून कचरा डेपोला आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. बायोमायनिंगचेही दहा टक्केदेखील काम झालेले नसताना पर्यावरण विभागातून या ठेकेदाराला कोट्यवधींची बिले अदा करण्यात आली आहेत. हा ठेकेदार भोसरीतील भाजपच्या पदाधिकार्यांचा हस्तक आहे.
बायोमायनिंगच्या नावाखाली करण्यात आलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार दडपण्यासाठीच पुन्हा आग लावण्यात आल्याचा आपला संशय असून, आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी. मोशीतील कचरा डेपोला लागलेल्या आगीबाबत आपण वारंवार मागणी करूनही आयुक्त चौकशी करत नसल्याने प्रशासनाचाही या प्रकारामध्ये हात असावा, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे आयुक्तांनी आमच्या मागणीचा विचार करून तात्काळ चौकशी घोषित न केल्यास महापालिकेवर मोर्चा काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गव्हाणे यांनी दिला आहे.