वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून सांत्वनपर शासकीय मदत
नागपूर : वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर शासकीय मदत दिली.
गेल्या काही दिवसात मान्सून पूर्व वादळ वाऱ्यामध्ये ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज पडून शेतात काम करणारे मजूर मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दोन दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी आज पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या उमरेड तालुक्याला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी आर. विमला होत्या.
वीज पडून निधन झालेल्या इतवारीपेठ, उमरेड येथील दिवंगत उषा मांढळकर यांची कन्या दीपाली मांढळकर हिला ४ लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला. तर दुसऱ्या घटनेत शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्युमुखी पडलेले मौजा हिवरा येथील शेतकरी दिवंगत भाऊरावजी वाढई यांच्या पत्नी रमाबाई वाढई यांना सांत्वनपर शासकीय मदत म्हणून ४ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला उपस्थित होत्या.