जबलपूर येथील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेत्या महाराष्ट्र महिला संघाचे तसेच उपविजेत्या राज्याच्या पुरुष संघाचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : जबलपूर येथे झालेल्या 54 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत आतापर्यंतचे 23 वे विजेतेपद मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या महिला संघाचे तसेच उपविजेत्या पुरुष संघाचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूला दिला जाणारा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जिंकलेली महाराष्ट्राची कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह सर्व सहकाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले आहे. महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला असला तरी विजेत्या रेल्वेच्या संघात 12 पैकी 11 खेळाडू महाराष्ट्राचे आहेत, ही बाबही अभिमानाची असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूसाठीचा एकलव्य पुरस्कार जिंकणाऱ्या रेल्वेच्या महेश शिंदे याचे तसेच तृतीय क्रमांक विजेत्या कोल्हापूरच्या पुरुष संघाचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. वेग, चपळता, निर्णयक्षमतेचा कस पाहणाऱ्या खो-खो खेळात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे इथल्या मातीचेच वैशिष्ट्य असल्याचेही उपमुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.