खेड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस, मतभेद, गटबाजी!
खासदार डॉ. अमोल कोल्हें यांच्या आमदार मोहितेंनी टीका केल्याने राजकीय चर्चेला उधाण
खेड : शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांनी जनतेत यावे, बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या बरोबरच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, यू-ट्युब’वर किंवा व्याख्यान देऊन जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी अपेक्षा आमदार दिलीप मोहिते यांनी अनेकदा व्यक्त केली. ज्या अपेक्षेने लोकांनी मतदान केले, त्या जनतेच्या मनातील खदखद मोहिते यांनी नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात व्यक्त केली होती, त्यामुळे खेड तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये धुसफूस, मतभेद, गटबाजी असे राजकीय रंग दिले जात आहेत.
काही महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा बॅंक आणि जिल्हा दूध संघ आदी निवडणुका आहेत. त्यावर या घटनेचा मोठा परिणाम होईल, असे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. आमदार मोहिते यांनी मेळाव्यात उपस्थित केलेला मुद्दा हा पक्षांतर्गत विषय आहे. कदाचित चार भिंती आड सोडविण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा होईल; मात्र खासदार डॉ. कोल्हे यांना आता आमदार मोहिते यांनी म्हटल्यानुसार जनतेला अपेक्षित असलेली कामे, आश्वासने पूर्ण करावी लागणार आहेत.
खेड राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आमदार दिलीप मोहिते यांचा एक खंबी तंबु भक्कम झाला आहे. त्यांना प्रबळ असा पक्षात किंवा विरोधी पक्षात दावेदार विरोधक तूर्तास तरी नाही. त्यामुळे खासदारांना डिवचले म्हणून खेड तालुका राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारचा राजकीय भूकंप येणार नाही. तालुक्यात मोहिते म्हणतील तेच होईल, अशी सध्याची पक्षीय स्थिती आहे आणि खासदार डॉ. कोल्हे त्यात लक्ष घालणार नाहीत. शिवाय टीकाटिप्पणी वरून खासदार डॉ. कोल्हे व आमदारांचे टोकाचे मतभेद होण्याची शक्यता नाही. कारण लोकसभा, विधानसभा निवडणुका खूप दूर आहेत.
नाद करा पण अण्णांचा कुठे!
राजकीय शत्रू असो की स्वपक्षीय विरोधक टापूत आला की त्याला सुट्टी नाही. असे राजकारण करून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे कसब खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी आत्मसात केले आहे. थेट आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला धारेवर धरण्याचा त्यांचा हा पहिला प्रयोग नाही. विकास कामे, कार्यकर्त्यांना पदाची संधी मिळवून देताना त्यांनी अनेकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी वाद घातलेला आहे. विरोधात टोकाची भूमिका घेणारा साध्या कार्यकर्त्या पासून ते आमदार, खासदार, मंत्री यांना तडकाफडकी बोलून तालुक्याचे हित साधण्याचे काम त्यांनी यापठीमागे वेळोवेळी केले आहे आणि म्हणूनच खेडची जनता म्हणतात “अण्णांचा नाद करायचा नाय’!
“रोखठोक भूमिकेमुळे पुन्हा आमदार’
खेड तालुक्यातील जनतेच्या हिताचे जे असेल त्यासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावरून वाट्टेल ती किंमत मोजणारा नेता म्हणून आमदार दिलीप मोहिते यांनी जनमानसात स्थान मिळवले आहे. संघर्ष करून मिळालेल्या संधीचे सर्वसामान्य लोकांसाठी सोने करण्यासाठी प्रयत्न करताना त्यांनी कधीच परिणामांची चिंता केली नाही. पराभूत झालेला आमदार पुन्हा आमदार होत नाही, असा तालुक्याला या पाठीमाचा इतिहास असताना दिलीप मोहिते यांना खेड तालुक्याने पुन्हा आमदार केले ते केवळ त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळेच.