मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबार सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण करावे – पालकमंत्री अस्लम शेख
मुंबई : वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत आज मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला. या मध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सर्व तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश शेख यांनी दिले.
यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे संजय पाटील, झोपडपट्टी पुनर्वसनचे सहायक अभियंता संतोष शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिका व म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या जनता दरबारमध्ये उपस्थित नागरिकांनी आपले विनंती अर्ज मंत्री शेख यांच्याकडे सपूर्द करत आपले म्हणणे मांडले. यामध्ये माझगांव विभागातील बीआयटी चाळीचा पुनर्विकास, गिरगांव चौपाटी सेल्फीपॉईंट करिता निधी उपलब्ध करणे, आमदार व खासदार यांच्या स्थानिक निधीतून बांधण्यात आलेल्या जागांचे मालमत्ता कर माफ करणे, वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामामुळे आचार्य दोंदे मार्ग परळगाव रस्त्यावर वाहतुकीमुळे होणारी गैरसोय, मलबार हिल परिसरातील मुलभूत कामे, धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकर पूर्ण करणे, वाळकेश्वर येथील तलावाची साफसफाई होणे, तसेच दक्षिण मुंबई येथील ए, सी आणि डी वार्ड मधील पाणीपुरवठा सुरळीत करणे आदी तक्रारींबाबत तातडीने निवारण करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना मंत्री शेख यांनी दिल्या.