आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळापूर्व कामांचा घेतला आढावा
मुंबई : पूरजन्य परिस्थितीच्या तयारीचा आढावा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन घ्या, तसेच पूरपरिस्थिती हाताळण्याचे नियोजन करताना स्थानिकांचा सहभाग वाढविण्याची सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आदी कामे प्राधान्याने करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः यात लक्ष घालून ही कामे पूर्ण करावीत. नियंत्रण कक्ष, अग्निशमन दलासह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश नगरविकासमंत्र्यांनी आज दिले. दरम्यान, पावसाळ्यात आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री, उपकरणांच्या खरेदीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देतानाच जिल्ह्यांनी नियोजन समितीच्या निधीतून अत्यावश्यक खरेदी करण्याच्या सूचना नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका- नगरपंचायतींनी केलेल्या तयारीचा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन निर्देश दिले असून शहरांमधील नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाची सज्जता, धोकादायक इमारती, वृक्षछाटणी आदी विषयांवर महानगरपालिका, नगरपालिकांनी तातडीने कार्यवाही करावी, त्यासाठी विविध विभागांशी समन्वय राखण्याच्या सूचना नगरविकासमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
नालेसफाईवर विशेष लक्ष द्या
शहरांमधील नाल्यांची १०० टक्के सफाई होईल याकडे विशेष लक्ष पुरवून नालासफाई झालेल्या भागातील गाळ, कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शहरातील पाणी साचणारी ठिकाणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देतानाच रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्याचे निर्देशही मंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी पूर्वतयारी करुन ठेवण्याबरोबरच शहरातील मोठे होर्डिंग्ज पडून दुर्घटना घडणार नाही त्यासाठी होर्डिंग्जची तपासणी करण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिल्या.
नियंत्रण कक्ष सज्ज ठेवा
पावसाळ्याच्या काळात संकटसमयी शहरांमधील रहिवाशांना तात्काळ मदत पोहोचावी यासाठी सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी आपले नियंत्रण कक्ष सज्ज ठेवावेत. जनतेला माहिती देण्यासाठी अलर्ट प्रणाली कार्यन्वित ठेवण्याबरोबरच नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जनतेपर्यंत प्रसारमाध्यमांद्वारे पोहोचविण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्र्यांनी दिल्या. नियंत्रण कक्षाची सज्जता तपासण्यासाठी मॉकड्रिल घेण्याबरोबरच नियंत्रण कक्षाला आयुक्तांनी अचानक भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.