आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील सुविधा विकासासाठी एकत्र यावे – पालकमंत्री बच्चू कडू
अकोला : ग्रामिण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास करणे तसेच आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रित काम करावे. आरोग्य आणि शिक्षणाच्या विकासासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र येऊ या, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व आमदार महोदय व सदस्यांना केले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवनात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपवनसंरक्षक के. आर. अर्जूना, उपायुक्त नियोजन किरण जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, सहायक नियोजन अधिकारी कैलास देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते
या बैठकीत प्रारंभी गत बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन अहवालावर चर्चा झाली. तसे सन 2021-22 च्या मार्च अखेरील खर्चास पुनर्विनियोजनासह मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत झालेल्या खर्चास (25 मे 2022 अखेर) मान्यता प्रदान करण्यात आली. सन 2021-22 मध्ये जिल्ह्यात 80 पाणंद रस्त्यांचे काम महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अभिसरण योजनेतून हाती घेण्यात आले, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 9 कोटी 27 लक्ष रुपयांच्या निधी मागणी करण्याचा प्रस्ताव सादर करणे, 2020-21 मधील 99 पाणंद रस्त्यांसाठी वाढीव खर्च 2 कोटी 50 लक्ष रुपये मंजूरीसाठी विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 2 साठी 13 कोटी 80 लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक योजनेतून सात टक्के संभाव्य बचतीतून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच जिल्ह्यात तालुकानिहाय नविन आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठी बृहत आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची मान्यता देण्यात आली.
आमदार महोदयांनी तसेच अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पालकमंत्री कडू यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यासंदर्भात लवकरच (दि.11 किंवा 12 )मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे बैठक होऊन त्यात निर्णय होईल. जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांच्या दुरुस्ती वा बांधकामासाठी देण्यात येणारा निधी हा त्या त्या शाळेच्या दुरुस्तीचा प्राधान्यक्रम ठरवून देण्यात येईल. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शिक्षण आरोग्य सुविधांच्या विकासाला सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामिण भागात अग्निशमन सुविधा उपलब्धतेसाठी बाजार समित्यांना अग्निशमन बंब उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. पूर्णा नदीत अमरावती जिल्ह्यातून येत असलेल्या प्रदूषित पाण्यासंदर्भात अमरावती येथे बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.