‘नारळ’ : आपल्या आरोग्याचा ‘कल्पवृक्ष’! जाणून घ्या नारळाचे फायदे
भारतीय संस्कृतीत नारळाला एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक प्रसंगात नारळ, श्रीफल, कल्पफळ, माडफळ या विविध नावांनी आपल्या जीवनात अविभाज्य घटक बनला आहे. संस्कृतमध्ये नारळाला नारिकेल, कन्नडमध्ये टेंगू, इंग्रजीत कोकोनट, लॅटिनमध्ये कोकम असे म्हणतात.
भारतात समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात याची लागवड आढळते. दक्षिण भारत, मलबार, कोकण, कारवार, श्रीलंका, केरळ, इंडोनेशिया, अमेरिका, आफ्रिका, ब्राझील, भारत येथे एकूण जागतिक उत्पादनापैकी 73 टक्के उत्पादन आढळते.
दमट ठिकाणी नारळाचे झाड चांगले येते. मात्र नारळाची लागवड कोठेही होऊ शकते. याचे उत्पादन खूप खास मशागत न करताही येऊ शकते. भारतीय आहारात नारळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नारळाच्या मुळापासून फळाच्या शेंडीपर्यंत प्रत्येक भाग आर्थिक उत्पन्न देणारा तसेच औषधी असल्यामुळे त्याला कल्पवृक्ष म्हणतात.
ओला नारळ, सुका नारळ, कच्चा नारळ, शहाळे त्याचप्रमाणे नारळाचे पाणी, नारळाचे तूप, नारळाचे तेल व करवंटी तेल, राख यांना औषधी म्हणूनही आयुर्वेदात महत्त्व आहे. नारळ शरीरात बल आणि स्निग्धता वाढवितो. ज्यांचे शरीर कृश आहे, त्यांनी रोज पाच ते सात ग्रॅम ओल्या खोबऱ्याचा तुकडा खडीसाखरेबरोबर अनशापोटी घेतल्यास दोन ते तीन महिन्यांत शरीरावर मांस व तेज दिसू लागते.
नारळाचे दूध
नारळाचे दूध शरीराला शक्ती मिळवून देते. 25 ग्रॅम ओले खोबरे वाटून त्यातून दहा मिलीलिटर दूध निघते. त्यामुळे तोंडाला चव येते. सुका खोकला किंवा ढास लागल्यास वरीलप्रमाणेच हे दूध खडीसाखरेबरोबर घ्यावे. शरीरात गाठी होत असल्यास नारळाच्या दुधात वेलची पूड घालून ती घ्यावी.
नारळाचे पाणी
हिरव्या कच्च्या नारळाचे पाणी म्हणजेच शहाळ्याचे पाणी प्यायल्यास मूत्रविकारात आराम पडतो. दाह कमी होतो. स्मृतीदोष असल्यासही नारळाचे पाणी उपयुक्त ठरते. पोटात कृमींचा प्रादुर्भाव झाल्यास शहाळ्याचे पाणी प्यावे, पूर्ण वाढलेल्या जुन्या नारळाचे पाणी किंचित पित्त वाढविते. उन्हाळ्यात शरीर उष्णतेने भगभगते. डोळ्यांची हातापायांची आग होते अशावेळी हातापायांना शतधौत घृत मलम लावून शहाळ्याचे पाणी प्यायल्यास आराम पडतो. नारळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तो स्वच्छ व नितळ होतो. मुरमे नाहीशी होतात.
नारळाचे तूप
नारळ फोडून तो किसून घ्यावा. बारीक वाटून त्याचे दूध पिळून काढावे. मोठ्या तोंडाच्या एका मडक्यात घालून, मडक्याचे तोंड झाकून सहा ते आठ तास थंड जागेत रात्रभर ठेवावे. सकाळी ते दूध घुसळून द्यावे. त्याला लोणी येईल. ते कढवून तूप करता येते.
वातविकारावर आयुर्वेदातील हे सर्वोत्तम औषध आहे. अर्धांगवायू विकारावरही नारळाचे तूप पोटात व मसाजसाठीही वापरतात.
नारळाचे तेल
नारळाचे तेल आवेल, मुठेल व घाण्यातील असे तीन प्रकाराने काढतात. आवेल तेल करण्यासाठी नारळ किसून त्याचे दूध काढून मंद आच देतात. तेल सुटे झाल्यावर ते औषधी म्हणून पोटात घेता येते. हे तेल केसांना लावण्यास अत्यंत उपयुक्त असते. मुठेल तेल म्हणजे जुना झालेला नारळ किसून, थोडा वाळवून, मुठीने दाबून तेल निघते.
हे तेल अंगाची मालिश करण्यास, सांध्याच्या दुखऱ्या भागावर लावण्यास वापरतात. घाण्याचे तेल सहज उपलब्ध असल्यामुळे ते जास्त प्रमाणात वापरले जाते. नारळाचे तेल केस वाढवणारे, जखमा भरून आणणारे आहेत.
नारळाची चव
तेल काढून खाली शिल्लक राहिलेल्या पेंडीस चव म्हणतात. ही चव बारीक वाटून त्यात हळद घालून गरम करून मुकामाराच्या जागेवर बांधतात.
नारळाची करवंटी
नारळाची करवंटी चंदनाप्रमाणे उगाळून त्या गंधात मध मिसळून तोंडास चव नसणे, ओठ फुगणे, कफ विकार, भूक चांगली न लागणे या सर्व विकारात सकाळी अनशापोटी घेतात. करवंटीचे गंध खरूज, नायटा व कोड या प्रकारांतही वापरतात. करवंटी जाळल्यावर उरणाऱ्या राखेचा वापर दात घासण्यासाठी करतात. करवंटी जाळताना जे तेल निघते, तेही खरूज, गजकर्ण, नायटा या त्वचारोगांवर वापरतात.
अमेरिकेत नारळाच्या दुधाचा वापर कॉडलिव्हर ऑईलला पर्याय म्हणून केला जातो. क्षीणता व फुफ्फुसाच्या रोगांत लहान मुलांना याचा खूप उपयोग होतो.
नारळाच्या झाडाची मुळी पोटात घेतली असता मूत्रदोष कमी होतात. मूत्रप्रवृत्ती वाढते. नारळाची शेंडी जाळून राख तयार करावी ती मधातून वारंवार चाटली असता उचकी व उलटी कमी होते. थंडीच्या दिवसात ओले किंवा सुके खोबरे गुळा समवेत खावे ज्यामुळे शरीर धष्टपुष्ट होते, हाडांची झीज भरून येते. पुरूषाची छाती भरदार होवून शरीर शक्तीमान बनते.
गरोदर स्त्रीला खोबऱ्याचा खुराक दिल्यामुळे बाळाची मांसपुष्टी चांगली होते. शरीरात तात्काळ उत्साह वाढवणारे व शुक्र वाढवणारे खोबरे शरीरातील उष्णताही वाढवते. नारळापासून चटया, काठ्या, हस्तकलेच्या वस्तू बनतात त्या वेगळ्याच. अशा या नारळाला कल्पवृक्ष वनौषधी म्हणतात.