जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला शुद्ध पाणी देणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
येणाऱ्या ३० वर्षांत वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचे नियोजन
नंदुरबार। सह्याद्री लाइव्ह। ‘हर घर जल’ या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावतील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी पोहोचविण्याचा मानस आहे. तसेच येणाऱ्या ३० वर्षातील लोकसंख्या वाढीचा दर लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद नंदुरबार कडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मंजुर योजनांच्या तालुक्यातील दुधाळे येथील भूमीपूजन सोहळ्यात डॉ.गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित नंदुरबारच्या एमजीपी योजनेचे अधिकारी निकुंभे, श्रावण चव्हाण,सविता जयस्वाल,बापू पवार, जालिंदर पवार, बेबीबाई गावित,सरलाबाई पवार,दीपक पवार,रमेश बोरसे,पावबा मोरे,नरेंद्र पाटील,जगदिश पाटिल,मक्खन कोळकर, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, ५५ लिटर पाणी प्रति व्यक्ती प्रति दिन याप्रमाणे पुरविण्यात यावे, असे मानक या योजनेचे आहेत. या मानकाप्रमाणे २०२४ पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. या योजनेसाठी केंद्रशासन ५० टक्के, राज्यशासन ५० टक्के आणि १० टक्के लोकवर्गणी अशी निधीची उपलब्धता राहणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर ती यशस्वीपणे चालविल्यास आणि देखभाल दुरुस्ती योग्य रीतीने केल्यास ग्रामपंचायतीला योजनेच्या एकूण खर्चाच्या १० टक्के रक्कम प्रोत्साहन बक्षीस म्हणून देण्याची यात तरतूद आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले
मागेल त्याला घर देणार
घरकुलांच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला घर देण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली असून ज्यांचा पात्रतेच्या निकष यादीत समावेश होवू शकलेला नाही, अशाही मागणी करणाऱ्या प्रत्येक समुदायातील व्यक्तिला पुढील वर्षात हक्काचे घर मिळवून देणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हा योजनेचा गाभा आहे. त्यानुसार २०२४ पर्यंत देशातील ग्रामीण भागातील घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रति दिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे. यानुसार आदिवासी पाडे, शाळा, अंगणवाडी, वसतिगृहे आदी ठिकाणीही नळ जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद नंदुरबार कडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मंजुर पातोंडा, वाघोदा,खोंडामळी (८ गावे )व उमर्दे (६गावे) या योजनांच्या भुमीपूजनही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
भूमिपूजनाचे कार्यक्रम
उद्या (रविवार, दि. १८ डिसेंबर २०२२) जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेल्या कोपर्ली, सारंगखेडा, कुकावल, वडाळी व प्रकाशा येथील योजनांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नंदुरबार यांच्यावतीने देण्यात आली आहे.