कर्तव्यपूर्ती यात्रेतून मेळघाटातील नागरिकांना शासकीय योजनांचा तात्काळ लाभ मिळणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
धारणी तालुक्यात 25 ते 29 एप्रिल दरम्यान 'कर्तव्यपूर्ती यात्रा'
अमरावती : मेळघाट मधील एकही आदिवासी व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले तात्काळ या राहुटी यात्रेत उपलब्ध करून देण्यात येतील. कर्तव्य पूर्ती यात्रेच्या माध्यमातून मेळघाट मधील सर्वसामान्य नागरिकांच्या सर्व विभागांशी संबंधित अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यात येतील. अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिली.
मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी संकल्पनेनुसार कर्तव्यपूर्ती यात्रा उपक्रम 25 ते 29 एप्रिल दरम्यान धारणी तालुक्यात ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. आज मेळघाटातील कळमखार येथे आयोजित कर्तव्यपूर्ती यात्रेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार राजकुमार पटेल, कळमखारच्या सरपंच मुन्नीताई मावस्कर, पंचायत समिती सदस्य रोहित पटेल, माजी जिल्हा परिषदे सदस्य श्रीपाल पाल, धारणीचे प्रकल्प अधिकारी विनोद धनगर, तहसीलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकारी महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी गुणवंत वरघट आदी उपस्थित होते.
‘फिरता सेतू‘ संकल्पना राबविणार
शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक ती कागदपत्रे सर्वसामान्य व तळागाळातील सर्व नागरिकांना सहजरित्या उपलब्ध व्हावी, यासाठी येत्या ऑगस्ट मध्ये मेळघाटातील सर्व गावांमध्ये फिरत्या वाहनाच्या माध्यमातून ‘फिरता सेतू’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती कडू यांनी दिली. यामुळे कागदपत्रांची पूर्तता प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होईल व योजनांच्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी कर्तव्य पूर्ती यात्रा
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, बालसंगोपन योजना आदी शासकीय योजनांच्या लाभासाठी या कर्तव्यपूर्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले असून येत्या 29 पर्यत धारणीतील सुसूरदा, टिटबा, बैरागड व हरीसाल येथे या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन कडू यांनी केले.
राज्यमंत्र्यांकडून स्टॉल्सची पाहणी व लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप
कर्तव्यपूर्ती यात्रेतील योजनांच्या शासकीय स्टॉल्सची पाहणी कडू यांनी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश संबंधितांना दिले. गावात स्वच्छतागृहांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याचा सूचना कडू यांनी केल्या.शर्मिला मावस्कर, सुमन बेठेकर, मीरा शेलेकर, लीला माकरकर, बायो शेलुकर, संगीता पटेल, अनिता काकडे, गोदावरी किलावेकर आदींना राज्यमंत्र्यांनी त्यांच्या शिधापत्रिकांचे वाटप केले.
कर्तव्यपूर्ती यात्रेत नागरिकांसाठी विविध विभागांचे स्टॉल्स
यावेळी शिक्षण विभाग, सेतू, कृषी, राशन विभाग, समाज कल्याण, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा व जलसंधारण विभाग, वन विभाग, विद्युत विभाग, वाहनचालक परवाना विभाग आदी शासकीय योजना प्रदान करण्याऱ्या विभागांचा समावेश असून मेळघाटातील दुर्गम भागातील, तसेच गोरगरीब नागरिकांनी आपल्या अडचणींचे कर्तव्यपूर्ती यात्रेच्या माध्यमातून निराकरणासाठी मेळघाटातील बांधवांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कडू यांनी केले.