डौलदार फेटा अन् ढोल-ताशा निनादात मुलांची शाळेत ‘पहिली एण्ट्री’!
होलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘शाळा पूर्वतयारी मेळावा’
खेड : कपाळी टीळा, डोक्यावर तुरेबाज फेटा, नवीन कपडे घालून गावातून वाजतगाजत जंगी मिरवणूक, पारंपारिक वेषभूषा केलेल्या मुलींची लेझीमने धरलेला ताल, शाळेच्या परिसरातील काढण्यात आलेली रांगोळी लक्ष्यवेधी ठरली. निमित्त होते इयत्ता पहिलीत दाखल होणा-या मुलांसाठीच्या शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे.
होलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (दि. १८) ‘शाळा पूर्व तयारी मेळावा’ भरविण्यात आला होता. या मेळाव्याने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी होलेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन होले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी होले, सदस्य गणेश होले, साधना होले, उषा होले, रेश्मा हुंडारे, उज्ज्वला वाळूंज यांच्यासह ग्रामस्थ विठ्ठल होले, सागर होले, ज्ञानेश्वर (माऊली) होले, किरण होले, काळूराम होले, दत्तात्रय टाव्हरे आदी उपस्थित होते.
शाळा पूर्वतयारी अभियानांतर्गत पहिलीच्या मुलांच्या विविध क्षमतांची तपासणी करण्यात आली. यामध्ये शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी या क्षमतांचा समावेश होतो. इयत्ता पहिलीची प्रवेश निश्चिती घेण्यात आली. मुलांची क्षमता तपासून मुलांच्या नोंदी घेण्यात आल्या. पालकांना पुस्तिका देवून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप केले.
सकाळी दहा वाजता शाळेच्या मैदानातून वाजतगाजत मिरवणुकीला सुरवात झाली. मिरवणुकीनंतर मुलांना औंक्षण, गुलाबपुष्प देवून स्वागत केले. पालकांसमोर आठ टेबलवर क्षमता विकास चाचणी घेतली आणि विद्यार्थ्यांना खाउवाटप केले. पालकांना पुस्तिका देवून मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक संदीप काळे, शिक्षिका रोहिणी लांघी, संगीता दिघे, पुष्पांजली राळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेविका म्हणून राजश्री मांजरे, ऋतुजा होले, अंगणवाडी सेविका ज्योती गुरव काम पाहिले.
पालक प्रियांका होले, शरद घाडगे, सीमा साळुंखे, पूजा होले, सुवर्णा होले, नीलम होले, पूनम पवळे आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहावी-सातवीच्या मुलांनी या उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दरम्यान, शिक्षक-पालकांचा व्हॉट्स ॲप ग्रुप तयार केला आहे. सुटीच्या काळात या ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांकडून पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत चर्चा केली जाणार आहे.
शाळेत ३१ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
होलेवाडी आणि परिसरातील पालक होलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस प्राधान्यक्रम देत आहेत. शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात आणि शिष्यवृत्तीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी भाविष्यात अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येणार आहे. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांबरोबर ग्रामस्थ पुढाकार उत्स्फूर्त प्रतिसाद असतो, असे मुख्यध्यापक संदीप काळे यांनी सांगितले.
‘सेल्फी पॉइंट’ची विद्यार्थ्यांना भूरळ
मुलांच्या आठ टप्प्यावर क्षमता विकास चाचणी घेण्यात आली. ही चाचणी अटोपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी खास ‘सेल्फी पॉइंट’ तयार करण्यात आला होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फोटो काढण्याचा आनंद घेतला.