उद्योग वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई। सह्याद्री लाइव्ह । मागास भागांत रोजगार निर्मिती व्हावी यासाठी उद्योग वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. इंडोरामा कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
इंडोरामा कंपनीमार्फत राज्यात नव्याने साडेचार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या माध्यमातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. इंडोरामा कंपनीचा सध्या नागपूर येथे वस्त्रोद्योग असून सुमारे दोन लाख कोटी रूपयांची उलाढाल आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे वस्त्रोद्योगाशी निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे. आगामी तीन ते चार वर्षांत टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे या भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळात इंडोरामाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी सुधींद्र राव यांचा समावेश होता. लोहिया यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पुष्पगुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.