मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांना श्रद्धांजली
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। “स्वातंत्र्य संग्राम ते स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी रस्त्यावर आणि विधिमंडळात संघर्षशील आणि ठाम भूमिका मांडणारे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘मन्याडचा वाघ’ म्हणून ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचा दरारा होता. स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि आणिबाणी विरुद्धचा लढा यात ते हिरिरीने सहभागी झाले. विधानसभेत कंधार भागाचे प्रदीर्घकाळ नेतृत्व केलेल्या केशवराव धोंडगे यांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि अगदी गुराखी यांच्यासारख्यांच्या प्रश्नावर शेवटपर्यंत आपली आग्रही भूमिका मांडली. रस्त्यावरील लढा आणि विधीमंडळातील त्याची समर्पक मांडणी यामुळे त्यांची भाषणं आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या निधनामुळे राजकारण, समाजकारणातील प्रेरणादायी, मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. अनेक सामाजिक चळवळींचा आधारवड नाहीसा झाला आहे असे सांगून ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.