चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती थाटामाटात साजरी
खरपुडी बुद्रुक । सह्याद्री लाइव्ह । विद्यार्थ्यांच्या तनामनामध्ये शिवचरित्राचा जागर व्हावा या हेतूने खरपुडी बुद्रुक येथील चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलने भव्य मिरवणूक काढून शिवजन्माचा सोहळा थाटामाटात संपन्न केला. समारंभाच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विधीवत पूजा करून राजांची पालखी मधून भव्य मिरवणूक काढली गेली.
मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी चित्तवेधक शिवगर्जना देऊन ढोल लेझीमच्या तालात नृत्याचा ठेका धरला. पालखी पुढील आश्वावर बसलेला बालशिवराय, पाठीमागे मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, नऊवारी साड्या परिधान करून नटलेल्या विद्यार्थिनी, ऐतिहासिक वेशभूषेतील चिमुकले छत्रपती, जिजाबाई, सोयराबाई या मिरवणुकीचे आकर्षण बनल्या.
शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने शिवव्याख्याते संपत गारगोटे यांच्या शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यानाने स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये शिवरायांचा इतिहास जागा केला. समारंभात विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या गौरव गीतावर सुंदर नृत्ये सादर केली.
छत्रपतींचा आदर्श घेऊन त्यांचे गुण आम्ही जीवनात अंगीकारू अशी विद्यार्थ्यांनी सामूहिक शिवप्रतिज्ञा घेतली. शिवजयंतीचा हा जल्लोष सर्व उपस्थितांनी डोळे भरून पाहिला. शाळेने आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. के. डी. चौधरी पाटील, सचिव आशालता चौधरी पाटील, व्हा. प्रिन्सिपल रोहिणी गव्हाणे, स्कूलचा शिक्षक वृंद, विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.