इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्राची मान्यता – उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मानले आभार
मुंबई | सह्याद्री लाइव्ह | राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत रांजणगाव (पुणे) येथे २९७.११ एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने आज मान्यता दिली आहे. या माध्यमातून ५००० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प राज्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले आहेत.
तसेच पुण्यामध्ये CDAC हाही प्रकल्प लवकरच येणार असून या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे ₹ २००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. युती सरकारने हे प्रकल्प राज्यात येण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला आहे. यास्तव समितीची १९ जुलै २०२२ रोजी बैठक घेण्यात आली होती.
या क्लस्टरसाठी ₹ ४९२.८५ कोटी खर्च होणार असून हा प्रकल्प ३२ महिन्यात पूर्ण होणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग येणार आहेत, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली आहे.