जलजन्य व कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी काळजी व उपाययोजना
पावसाळा हा ऋतु तसा सर्वांना आवडणारा असतो. उन्हाच्या काहिलीने जीव होरपळून निघतो आणि आपसूकच पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना पावसाच्या सरीने चिंब भिजून जावेसे वाटते. पावसाच्या पहिल्या सरीत चिंब भिजण्याचा आनंद जरी मनाला सुखावून जात असेल तरीही त्याबरोबरच येणा-या साथीचे आजार होऊ नये म्हणून काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे. पावसाचे पाणी पावसाळ्यात ठिकठिकाणी साचते. तसेच नदीपात्रात प्लास्टीकसारखा कचरा साचून राहिल्याने हे पाणी वाहते नसल्याने ते दूषित होते आणि त्यापासून डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, काविळ, गॅस्ट्रो, उलट्या, जुलाब, सर्दी, टायफाईड, अतिसार यासारखे जलजन्य आजार होतात.
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे विविध जलजन्य आजार उध्दभवतात. या आजारापासून संरक्षण करायचे असेल तर पुढीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी उकळून थंड करुन पिणे, भाजलेले व हलके पदार्थ खाणे ज्वारीच्या लाह्या सातुचे पीठ, भगरीचे पदार्थ, राजगिऱ्याच्या लाह्या हे पदार्थ पचायला हलके असतात. पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावलेली असल्याने अति तेलकट, पचण्याला जड असलेल्या पदार्थाचे सेवन करु नये. पुर्वीचे लोक चार महिने चातुर्मास म्हणजे चार महिने एकवेळच जेवण करायचे. दमट वातावरणामुळे आपण हिवाळा व उन्हाळ्यासारखा आहार घेऊ शकत नाही, घेतला तर तो रोग प्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तिच्या प्रकृतीला मानवत नाही.
जलजन्य आजारापासून संरक्षण व्हावे म्हणून बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाने पुढीलप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बीड या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, नियंत्रण कक्षातील मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. डॉ. पी. के. पिंगळे – 9422647483, एस. डब्लू. मांडवे – 8857915102, साजीद शेख -9421440788 याशिवाय, जिल्हा स्तरावर साथरोग संबंधित सर्व तज्ज्ञांचे शीघ्र प्रतिसाद पथक तयार करण्यात आलेले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जे. जे. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
जिल्हा स्तरावर एक आणि 11 तालुक्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हात एकूण 12 आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. साथीच्या रोगांमध्ये करावयाच्या तपासण्या संदर्भातील 1 जिल्हा प्राधान्य प्रयोग प्रयोगशाळा, 2 जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, जिल्हा रुग्णालय परिसर बीड या अद्ययावत ठेवण्यात आलेल्या आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये साथरोग नियंत्रणासाठी लागणारा औषधी साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे.
पावसाळ्यात साचलेले दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात मिसळून किंवा झिरपून पाणी दूषित होते. हे पाणी दूषित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा, 5 नगर पंचायती आणि 1031 ग्रामपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वीचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी दूषित होऊ नये, म्हणून पिण्याच्या पाण्याच्या पाणी उद्भवाचा 15 मीटरपर्यंतचा परिसर स्वच्छ असावा, परिसरामध्ये उकिरडे, गुरांचा गोठा, पाणी साचलेले खड्डे , तुंबलेल्या नाल्या, मानवी/ प्राण्यांची विष्टा नसावी. जेणे करून बाहेरील दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात झिरपणार नाही. पिण्याच्या पाण्याच्या उद्भवांचे व नळ योजनेच्या नियमानुसार नियमित शुध्दीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत होणे बंधनकारक आहे.
जनतेस कोणत्याही परिस्थितीत दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही, याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे काळजी घेतल्यास गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, विषमज्वर, अतिसार, हगवण इत्यादी जलजन्य आजारांची लागण जनतेस होणार नाही आणि परिणामी होणारे मृत्यू देखील होणार नाहीत.
डासांची उत्पत्ती होऊ नये, म्हणून घ्यावयाची काळजी
पावसाळ्यामध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. ती टाळण्याकरिता घराच्या परिसातील पाणी वाहते ठेवणे आवश्यक आहे. घरातील उघडे पाणीसाठे त्यावर झाकण ठेवावे व हे पाणी दर 8 दिवसाला बदलण्यात यावे. शनिवार हा कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. घरातील कुंड्या, कुलर्स यामधील पाणी नियमित बदलण्यात यावे. छतावर घराच्या परिसरात फुटके डब्बे, नारळाच्या करवंट्या, मातीचे बोळके, मडके, गाड्यांचे खराब टायर्स व निरूपयोगी वस्तू नष्ट करण्यात याव्यात, जेणे करून डासांची निर्मिती होणार नाहीत. रिकाम्या न करता येणाऱ्या मोठ्या पाणीसाठ्यामध्ये गप्पी मासे सोडण्यात यावेत .
डास चावू नयेत, म्हणून प्रत्येक खोल्यांमध्ये लिंबाच्या पाल्याचा धूर करणे अथवा डास पळवणाऱ्या वड्या /धूप /लिक्विड यांचा वापर करावा. मच्छरदाण्यांचा वापर करणे, लहान मुलांना अंग भरून कपडे घालणे याप्रमाणे काळजी घेतल्यास डासांमुळे होणारे डेंग्यु, चिकुन गुण्या, मलेरिया यासारखे आजार होणार नाहीत. घरातील आजारी व्यक्ती, वृद्ध माणसे, गरोदर महिला, एक वर्षाच्या आतील बालके यांनी पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे, जेणे करून जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही.