#Blog : Ladakh Diary – पराक्रमे विजयते… Kargil war memorial
भाग ४
@Rohidas Hole
क्रमांक १ च्या लेह-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाने सकाळी सातच्या सुमारास आम्ही लेह शहराला ‘आलोच’ म्हणत कारगीलच्या दिशेने मार्गस्थ झालो. कारगील सुमारे २१० किलोमीटर होतं आणि कारगील ते द्रास ७० किलोमीटर प्रवास. महामार्गालगत निम्मूगाव, सासपेल, नुरला, खालस्ते, लमायरू, हेनिस्कू-खंग्रल, नमिकला, शरोगील, पशकूम, कारगीलमार्गे द्रास असा साधारणपणे दिवसभराचा साहसी प्रवास असणार होता. त्यानंतर कारगील ते द्रास दरम्यान खरबूगाव, दंदल अशी काही बोटावर मोजण्याइतपत गावातून ‘कारगील वॉर मेमोरियल’ या युद्ध स्मारकाला भेट देण्याचे नियोजन ठरलं होते.
श्रीनगर महामार्गाने प्रवास सुरू होता. मात्र हा प्रवास खडतर वाटला. डोंगरावर साचलेला बर्फ, धुक्याची चादर, स्वत:ची अगळीवेगळी ठेवण जपत उभे असलेले भलेमोठे डोंगर, वक्राकार, नागमोडी रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा मातीची घरं आणि त्यावर गवतांच्या पेंढ्या अर्थात सुरवातीचा अर्धा-एक तासांच्या प्रवासात महामार्गालगत लोकवस्तीमध्ये गावपण जपलेलं जाणवलं. तीव्र चढ-उतारानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर निमू गावात सिंधू-इंडस नद्यांच्या अनोखा संगम पाहण्याची मजा काही औरच. या संगमानंतर पुढे लोवर इंडस नदी तीव्र उताराने कारगीलच्या दिशेने वाहते.
डोंगर कपारीत हिरव्यागार झाडीत डोकावणारी वस्ती, डोंगरावर जमिनीच्या दिशेने ओघळलेल्या मातीच्या वेगवेगळ्या छटा मनात आनंदी छटा भरतात. खडकांचे थरही प्रवासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. इंडस नदीतील पाण्याचा प्रवाह आणि आमचा थरारक प्रवास म्हणजे जणू स्पर्धाच सुरू असल्याचा भास वाटे. निरर्भ आकाशात ढगांची झालेली गर्दी आकर्षक दिसली. नुरला गावात पोहोचल्यावर उंचच उंच हिरव्या गर्द झाडांनी ‘वेल कम’ केलं. घरावर डोलणाऱ्या पाताका एकीचं प्रतीक दर्शवत होत्या.
#Blogs : Ladakh Diary – पृथ्वीवरचा स्वर्ग : लेह-लडाख
खालशी गावात भरपेट पोटपूजा झाली. क्षणभर विश्रांतीनंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा सफर सुरू झाली. खालशी चेकपोस्ट केलं आणि डावीकडे वळण घेत कारगीलच्या दिशेने NH 01 पुढील प्रवास सुरू झाला. वाटेतील लुमायरूमध्ये फोटोग्राफी झाली. कारगील शंभर किलोमीटर असा बोर्ड दिसला. त्यानंतर प्रवासातील दरडक्षेत्र कमी झाले. चढण रस्ता, पुढील काही प्रवास निर्मनुष्य, वस्तीहिन राहिला. फतोला पास (टॉप) नंतर पुन्हा तीव्र उतार आणि त्यामुळे बसचा वेग वाढला.
पर्वत रांगाची भव्यता नजरेत साठवण्यासारखीच होती. झुपकेदार गवत डोंगरावरील सौंदर्यात भर तर घालतच होते, पण रांगेतील जिवंतपणा दर्शवत होतं. हेनिस्कू गावाला रामराम ठोकला आणि कारगील (७९ किमी) विभागात पर्यटनासाठी येणाऱ्यांचे स्वागत (कमानीतून) केले. लडाख प्रांत काही वेगळाच भासतो. येथील वातावरण कधी बदलेल याचा नेम नाही, तसं कधी उकाडा तर कधी गारवा आता सवय होऊन गेली होती. खंग्रल गावात पोलीस चेक पोस्टवर करोना चाचणी केली का याबाबत चौकशी/विचारपूस केली. खडतर प्रवास सुरू असताना घड्याळात सकाळचे कधी अकरा वाजले समजले नाही. द्रास ११७ आणि कारगीलचा आणखी ५९ किलोमीटरचा प्रवास राहिला होता.
#Blogs : Ladakh Diary – खारदुंग-ला टॉप अन् नुब्रा व्हॅलीची थरारक सफर…
रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे डोंगरावरून मातीचा राडारोडा थेट रस्त्यावरच साचलेला. त्यामुळे वाहतूक सावकाश सुरू झालेली. नमिकला १२ हजार १९८ फूट उंचीवर आम्ही पोहोचलो. साधारणपणे पशकूमगावाला मागे टाकल्यानंतर काही वेळातच डोंगरकुशीत जागा मिळेल तसे वसलेले कारगील दृष्टिस पडले. कारगीलमध्ये प्रवेश होताच इंडस नदीच खळाळत वाहणारे पाणी, पाण्याच्या वेगवान प्रवाहाच्या आवाजाने लक्ष वेधले.
आता मोहीम द्रास (Drass)
दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्ही द्रासच्या दिशेने कूच केले. व्हॅलीतून वाहणारी जंगला नदी, उतार रस्ता, हळूहळू ढगाळ वातावरण निर्माण झाले. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे रस्त्याचा उतार जरी द्रासच्या दिशेने असला तरी नदीचा प्रवाह मात्र कारगीलच्या (विरूद्ध दिशेने) हे पाहून थोडं नवलं वाटलं. म्हणजेच नदीचा प्रवाह आणि आमचा प्रवास भिन्न दिशेने सुरू होता. वाटेतील खरबूगावात डोंगरमाथ्यावरून वाहणाऱ्या शुभ्र जलधारा उजाड डोंगरांमधील जिवंतपणाची साक्ष देत होता. जसजसे दंदल गाव आले तसे शेतीशिवार पाहायला मिळाले. गव्हाची शेती, रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी, बैठी घरं पाहून पर्यटक सुखावल्याशिवाय राहत नाही. दुपारी १.४० वाजता ‘कारगील वॉर मेमोरियल’पर्यंत (Kargil war memorial) पोहोचलो.
#Blog : Ladakh Diary – निसर्गाचा अद्भूत चमत्कार : पैंगॉग सरोवर Pangong Lake
कारगील वॉर मेमोरियलबद्दल…
भटकंती करण्यासाठी लेह-लडाखला आलेला पर्यटक, गिर्यारोहक कारगील युद्ध स्मारकाला भेट देतोच देतो. कारण देशाबद्दल, सैन्याबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात नितांत आदर असतो. लेह-श्रीनगर महामार्गावर द्रास या शहराजवळ भारतीय सैन्याद्वारा हे युद्ध स्मारक उभारण्यात आलेले आहे. १९९९ च्या भारत-पाकिस्तान कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या पवित्र स्मृती या ठिकाणी ज्योतीच्या रुपात सदैव तेवत आहेत. दरवर्षी कारगील वॉर मेमोरियलला (Kargil war memorial) भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येतात आणि शहीद जवानांच्या स्मृतीला अभिवादन करतात. नोंदवही तुमची ‘एण्ट्री’ झाल्यानंतर जवान तुम्हाला स्मारकाचे पावित्र टिकून राहवे म्हणून काही माहिती देतात. युद्ध स्मारकापासून प्रत्यक्ष युद्ध झालेले ठिकाणे दूरवरूनच आम्हाला दाखविण्यात आली. लढाऊ विमान, शहीद झालेल्या जवानांचे पुतळे आणि त्यांची ठळकपणे माहिती, फडकणारा तिरंगा, युद्धातील शस्त्र सारं काही हेवा वाटावा असेच दिसते.
हे माहित हवंय…
तयारीशिवाय ‘बाईक ट्रिप’चा विचार नको…
लडाखमध्ये ‘बाईक ट्रिप’ सर्वोत्तम सहज व सोपी वाटते. परंतु लडाखची सहल सोपी नसून, खडतर आहे. जाण्या आगोदर येथे तयारी करणे आवश्यक असून, यात तुम्ही योग्य थंड कपडे, अतिरिक्त पेट्रोल, उंचीमुळे होणाऱ्या आजारांसाठी औषधे, पोर्टेबल ऑक्सिजन घेणे, आवश्यक तेथे भेट देण्याचा परमिट, काही खाद्यपदार्थ, इलेक्ट्रोल पावडर आदी वस्तू ठेवणे आवश्यक आहे.