पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांची जैविक तपासणी करण्यात येणार
पुणे : जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांची जैविक तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, आता ही तपासणी त्या गावातील महिलांच करणार असून, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 13 जानेवारी रोजी एकाचवेळी सर्व स्त्रोतांची जैविक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमीत्य पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत नव्वद दिवसीय मोहिम राबविण्यात येत आहे. यादरम्यान ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचे जैविक फिल्ड टेस्ट किट च्या माध्यमातून हे पाणी तपासणी अभियान आयोजीत केले आहे. पुणे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी त्याच गावातील पाच महिलांची निवड करण्यात येणार आहे.
त्यांना पाणी नमुना संकलन आणि पाण्याचे जैविक तपासणी बाबतचे प्रशिक्षण जिल्हास्तरावरुन देण्यात येत आहे. जिल्ह्यातील 1 हजार 874 गावांमधून प्रत्येक गावातील पाच महिला याप्रमाणे एकूण 9 हजार 370 महिलांची निवड जल जीवन मिशन अंतर्गत आणि गुणवत्ता कामाकरिता करण्यात आले आहे.
जलसुरक्षकांना ‘जैविक फील्ड टेस्ट किट’चे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
पाण्याचे शास्त्रोक्त पध्दतीने तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दि. 11 जानेवारी रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यकक्षेतील दोन जलसुरक्षकांना जैविक फील्ड टेस्ट किट चे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण देणार.
त्यानंतर ते केंद्राच्या निरीक्षकांच्या समन्वयाने गावातील नियुक्त केलेल्या पाच महिलांना 12 जानेवारीला प्रशिक्षण देणार आहेत. तर या प्रशिक्षित महिला दि. 13 जानेवारी रोजी आपल्या गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांची जैविक तपासणी किटद्वारे करणार आहेत. याकरिता प्रत्येक गावांकरिता व पाण्याचे स्त्रोत संख्येनुसार स्वंतत्र जैविक तपासणी किट उपलब्ध करुन देणेत आलेले आहे.