चाकण-शिक्रापूर रस्त्यावर जेसीबीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; चालकाला अटक
चाकण । सह्याद्री लाइव्ह । चाकणहून शिक्रापूरकडे निघालेल्या एका दुचाकीस्वारास जेसीबीची धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. चाकण-शिक्रापूर मार्गावर बुधवारी (दि. १६) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी जेसीबी चालकास अटक केली आहे.
अर्जुन मच्छिंद्र पोळ (वय ३६) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी राकेश राजेंद्र पाटील (वय २९, रा. रासे फाटा, रासे, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. जळगाव) याला अटक केली आहे. याबाबत लक्ष्मण रावसाहेब मुळे (वय ३६, रा. जाधववाडी, चिखली, मूळ रा. पवळाचीवाडी, पो. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण मुळे यांचा भाचा मयत अर्जुन पोळ हा १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास दुचाकीवरून (एम.एच.२३/ए.व्ही./०८८७) जात होता. त्यावेळी समोरून शिक्रापूरहून चाकणच्या दिशेने जाणा-या जेसीबीची धडक बसली. या अपघातात दुचाकीचालक अर्जुन पोळ हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.