सावधान ! आळंदी परिसरातील शाळकरी मुलांमध्ये डोळे येण्याची साथ
आठवड्याभरात दिड हजारांपेक्षा अधिक मुलांना बाधा
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । आळंदी देवाची परिसरात डोळे येण्याची साथ पसरली आहे. सहा ते सोळा वर्ष वयोगटातील मुला – मुलींमध्ये ही साथ वेगाने परली आहे. वातावरणातील बदलामुळे या आजाराचे संक्रमण झाले आहे. आळंदी ग्रामीण रूग्णालयाच्या कार्यक्षेत्रात या आठवड्याभरात सुमारे १ हजार ७०० पेक्षा अधिक शाळकरी मुलांना हा साथीच्या आजार झाल्याचे समोर आले आहे.
शाळेत एकत्र येण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ही साथ झपाट्याने पसरली आहे. आळंदीत अनेक वारकरी विद्यार्थ्यांच्या संस्था आहेत. या साथीत जास्त प्रमाणात वारकरी विद्यार्थी बाधित झाले आहेत. तालुका आरोग्य प्रशासन व आळंदी ग्रामीण रूग्णालय यांनी या आजारावर मात करण्यासाठी झटपट पाऊले उचलली आहेत.
आळंदी ग्रामीण रूग्णालयाने पुण्यातून (औंध) एनआयव्हीच्या सिव्हिल सर्जन तपासणी पथकाला पाचारण केले आहे. या पथकाद्वारे बाधित मुलांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तसेच आळंदी ग्रामीण रूग्णालयात दोन नेत्रतज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आळंदी परिसरात सोमवारी ४५०, मंगळवारी ७०४, बुधवारी २१०, गुरुवारी १६० आणि शुक्रवारी दुपारपर्यंत १७० मुलांना या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. खेड तालुका आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे सध्या सोमवारच्या तुलनेत ही आकडेवारी घटू लागली आहे.
साथीची लक्षणे आढळून आल्यास विद्यार्थ्यांना सात दिवस घरी पाठवून विलगीकरणात ठेवून याग्य ते उपचार करावे. या सुचना आपल्या स्तरावर देण्यात याव्यात अशा आशयाचे पत्र आळंदी ग्रामीण रूग्णालयाने गटशिक्षणअधिकारी, नगरपालिका प्रशासनाला पाठवले आहे.
खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात खबरदारी म्हणून शाळा, आश्रमशाळा व अंगणवाडीतील मुलांचा सर्व्हे करून तपासणी केली जात आहे. विशेषत: आळंदीत दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारी आळंदीव्यतिरिक्त तालुक्यातील तीन हजार ३४५ विद्यार्थी तपासले असून त्यापैकी २५ जण डोळे आलेले आढळुन आले. सर्वांवर उपचार करून त्यांचे घरी विलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली.
डोळे आल्यास ही खबरदारी घ्या
डोळ्यांची स्वच्छता राखावी.
डोळ्यांना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
डोळे आलेल्या व्यक्तिने घराबाहेर पडताना चष्मा वापरावा.
आपला रूमाल, चष्मा, आयड्रॉप्स किंवा इतर वस्तू इतरांना वारण्यास देऊ नये.
डॉक्टरांच्या सल्यानुसार वेळीच उपचार घ्यावेत.
आजाराची लक्षणे
डोळ्यांची जळजळ होणे.
डोळे दुखणे.
डोळ्यांतून सतत पाणी येणे.
पापण्या चिकटणे.
डोळ्यांना प्रकाश सहन न होणे.