उच्च शिक्षणासाठी ‘स्वाधार’चा आधार; गावाकडच्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायी योजना
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरात राहण्यासाठीचा खर्च आता सरकारकडून मिळणार आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात किंवा ग्रामीण भागांपासूनच्या जवळ असलेल्या छोट्या शहरांमध्ये उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे ब-याचदा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरांमध्ये जावे लागते. शहरात राहण्याची सोय न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. यावर उपाय म्हणून ही योजना सरकारने सुरू केली आहे.
विद्यार्थ्यांना लाभ किती ?
या योजनेतून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्या व जेवणाचा खर्च म्हणुन प्रति विद्यार्थी 12 महिन्यांसाठी 42 हजार इतकी रक्कम दिली जाते. इतर जिल्हा किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 12 महिन्यांसाठी 60 हजार तसेच या रक्कमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येते.
विद्यार्थी पात्रता
विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असावा. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानिक नसावा, विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा तो रहिवासी नसावा, 10 वी नंतर आणि 12 वी नंतर व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा. इयत्ता 11 वी आणि 12 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 10 वीत किमान 50 टक्के तर 12 वी नंतर व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षाला किमान 50 टक्के गुण असावे.
मान्यताप्राप्त महाविद्यालय व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येते. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहतो. या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी 40 टक्के इतकी आहे.
कागदपत्रे : मार्कशीट, जातीचा दाखला, रहिवासी दाखला तसेच विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक बॅंक खात्याशी संलग्न असावा.
अर्ज कुठे करावा?
विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे, त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे योजनेसाठी अर्ज करावा लागतो. विद्यार्थ्यांची महाविद्यालय, शालेय उपस्थिती 75 टक्के असणे आवश्यक आहे.