बारामतीत “नाईकांचा वाडा’ होणार पर्यटन क्षेत्र
जुन्या धाटणीचा नवा लूक मिळणार : विकास आराखडा तयार
बारामती : पूर्वीची भीमथडी म्हणून ओळखली जाणारी आत्ताची बारामतीनगरी विकासाची कात टाकत आहे. ती आता मेट्रोसिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्हास्तरावरील विविध प्रकल्प बारामतीत उभे आहेत. बारामतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी लवकरच शहरात मध्यवर्ती ठिकाणी पॅरिसमधील “सिटी सर्कल’च्या धर्तीवर बारामतीत “सिटी सेंट्रल’ प्रकल्पाची उभारणी व भीमथडी ते बारामती प्रवासाचा साक्षीदार असणारा श्रीमंत बाबूजी नाईकांच्या वाड्याची जुन्या धाटणीने नव्याने उभारणी होणार आहे.
शहरातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीच्या काठावर 1743 मध्ये श्रीमंत बाबूजी नाईक यांनी भव्य वाडा उभारला आहे. हा नाईकवाडा भीमथडी ते बारामती अशा इतिहासाचा वैभवशाली साक्षीदार आहे. हा अमूल्य ठेवा जतन करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आहे. त्यांच्या निर्देशानुसार “नाईक’वाडा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होणार असून, सध्या त्याचे काम सुरू झाले आहे.
श्रीमंत बाबूजी नाईक हे रसिक व गुणज्ञ व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कालावधीत कवी मोरोपंताना राजश्रय मिळाला होता. त्यांनी अनेक विद्वान आणि गुणीजणांना आपलेसे केले होते. कऱ्हा नदीच्या तीरावर हा वाडा 1743 मध्ये उभारला. हा वाडा भीमथडी ते बारामती अशा इतिहासाचा वैभवशाली साक्षीदार आहे. ही बाब विचारात घेऊन वाड्याचे ‘जैसे थे’ नूतनीकरण होणार आहे.
वाड्यामध्ये संग्रहालयाची उभारणी करणार असून, यामध्ये प्रामुख्याने 1743 ते 1780 पर्यंतचा नाईक यांचा जीवनपट उलगडणार आहे. 1780 ते 2014 पर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक घडामोडींच्या घटनाक्रमांचे बदल, बारामती तालुक्यातील ऐतिहासिक दगडी शिलालेख पर्यटकांना पाहवयास मिळणार आहे. वाड्याच्या तटबंदीची दुरूस्ती, तटबंदीवरून पर्यटकांना चालता येणार आहे, अशा पद्धतीने बांधकाम होणार आहे.
बुरुंज, नगारखाना, महाप्रवेशद्वाराच्या पडझडीचे पुर्नबांधकाम केले जाणार आहे. नाईकवाडा पर्यटन क्षेत्र विकासाचे काम सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तुविशारद पी. के. दास यांनी बांधकाम तज्ज्ञाच्या साह्याने वाड्याचा विकास आराखडा बनविला आहे. लवकरच हा वाडा बारामतीसह पर्यटकांना पाहण्यासाठी सज्ज होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.
दृष्टीपथातील विकास…
- नगारखाना
- महाद्वार
- वस्तु संग्रहालाय
- 8 बुरूज पुर्नबांधकाम
- तटबंदी मजबुतीकरण
- सभागृह
- संपर्कं कार्यालय
- 800 स्वेअर फुट लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राऊंड
- 10 दुकाने (उपहारगृहाचा समावेश आहे.)
बारामतीचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकर शहरातील बाबूजी नाईकांच्या वाड्याचा विकास होणार आहे. यामुळे बारामतीच्या वैभवात आणखी भर पडणार आहे याचा आनंद वाटतो.
– बिरजू मांढरे, नगरसेवक, बारामती.