कार्तिकी वारीनिमित्त आंळदीमध्ये दिंडीच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना बंदी
वाहतुककोंडी रोखण्यासाठी प्रशासनाची उपाययोजना
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीदिन सोहळा म्हणजेच कार्तिकी वारीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरवर्षी कार्तिकीवारीसाठी देशभरातून लाखो भाविक आंळदीला येत असतात. या यात्रेमध्ये भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी काही दिवस आधीपासूनच प्रशासनाची लगबग सुरू असते.
खेड तालुक्यात सगळ्यात मोठी मानली जाणारी समस्या म्हणजे वाहनांची गर्दी, पार्किंगची गैरसोय आणि ट्रफिकमुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास… कार्तिकीवारीमध्ये येणा-या भाविकांना यामुळे त्रास होऊ नये म्हणून सोमवार दि. ४ पासून पुढचा सोमवार दि. १२ या आठवडाभरासाठी आळंदी शहरात दिंड्यांची वाहने वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
अशी असेल वाहतूक
परिसरातील मरकळ धानोरे औद्यागिक भागात पुणे भोसरीमार्गे जाणारी वाहने च-होली खुर्द, च-होली बुद्रुक बाह्यवळणमार्गाने वळवली जातील. चाकण मोशीमार्गे येणारी वाहतूक पुणे नाशिक महामार्गावरील जय गणेश साम्राज्य चौक अलंकापुरमार्गे वळवण्यात आली आहे.