जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त राजगुरुनगर येथे जनजागृती फेरी
राजगुरूनगर | सह्याद्री लाइव्ह | जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त कॉक्लिया पुणे फॉर हिअरींग अँड स्पिच यांच्या स्वरनाद कर्णबधिर बालकांच्या बहुआयामी अपंग पुनर्वसन आणि वाचा भाषा प्रशिक्षण केंद्रातर्फे जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली होती.
कर्णबधिरांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी तसेच त्यांची समाज आणि देशातील उपयुक्तताही समजावी या हेतू ने जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त कार्यक्रम व जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रा. शिरीष पिंगळे, डॉ. सुभाष खडके, डॉ. शिवाजीराव गायकवाड, सचिन मधवे, पोलीस अधिकारी सुनिल बाडे, चेतन चव्हाण, डॉ. नेहा राऊत, डॉ. विशाखा तांबे व सदाशिव आमराळे उपस्थित होते.
यावेळी प्रा. शिरीष पिंगळे यांनी सांगितले की कॉक्लिया संस्थेतर्फे कर्णबधीर मुलांसाठी मोफत शिक्षणाची चांगली सोय उपलब्ध असुन आपल्या जवळपास असलेल्या अशा मुलांस या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यास पाठवले तर या मुलांना चांगला फायदा होईल. तसेच या संस्थेला दानशूर नागरीकांनी शक्य ती मदत करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन स्वरनादच्या शिक्षिका मंगल पाटील, अयोध्या शिंदे, स्वाती मोरडे, कांचन बागल व पल्लवी निघोट यांनी केले. केंद्राच्या प्रमुख मंगल पाटील यांनी संस्थेची माहिती देऊन डॉ. अविनाश वाचासुंदर व रक्षा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचं कार्य सुरू असुन कोणी कर्णबधिर मुले असतील तर त्यांनी डॉक्टर सुभाष फडके यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.