लोकगीत, पोवाडा, बतावणी, लोककलांच्या माध्यामातून शासकीय योजनांचा गावागावांमध्ये जागर
उस्मानाबाद (जिमाका):- लोकगीत,पोवाडा, बतावणी,सवाल जबाब, लोककलांच्या प्रभावी संवादातून राज्य शासनाच्या दोन वर्षातील योजनांचा उस्मानाबाद जिल्ह्यातील गावोगावी जागर सुरू आहे.या लोककलांच्या माध्यमातून जनसंवाद आणि जनसंपर्क साधण्याचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरू असलेल्या अभियानास गावोगावी उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या नऊ मार्च 2022 पासून लोककलांच्या माध्यमातून आपला महाराष्ट्र,आपले सरकार, अंतर्गत दोन वर्ष विकासाची महाविकास आघाडीची या अंतर्गत राज्य शासनाने दोन वर्षात नव्याने आणलेल्या आणि राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची तसेच विकास कामांचीं माहिती देण्यासाठी तीन लोककलापथकांच्या माध्यमातून प्रसिध्दी अभियान राबविण्यात येत आहे.यामध्ये महिषासूर मर्दिनी लोककलामंच व लोककलापथकांचे प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या संचाने गेल्या दोन दिवसात म्हणजेच 15 व 16 मार्च रोजी जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील अचलेर,उमरगा तालुक्यातील गुंजोटी,नारंगवाडी आणि बलसूर येथे कार्यक्रम करून योजनांची माहिती दिली. या गावातील ग्रामस्थांनी या कलापथकांच्या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला आहे.
आदर्श लोकजागृती कलामंडळाचे प्रमुख प्रसिध्द शाहीर व लोककलावंत रामा जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली कलापथकाने उस्मानाबाद तालुक्यातील केळेवाडी, तडवळे, ढोकी आणि येडशी या गावात लोककलापथकाच्या कार्यक्रमाव्दारे राज्य शासनाच्या विकासकामाची माहिती दिली.त्यांच्याही या कार्यक्रमास ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या प्रसिध्दी अभियानात ईश्वर प्रभू कलामंचाचे प्रमुख ईश्वर प्रभू इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संचाने गेल्या दोन दिवसात जिल्हयातील परंडा तालुक्यातील सोनारी,अनाळी,कुकडगाव,आणि चिंचपूर (बू) येथे लोककला पथकांचे कार्यक्रम करून राज्य शासनाच्या दोन वर्षातील विकास कामांची माहिती देत लोकांचे मनोरंजन करून आपल्या कार्यक्रमात रंगत भरली.त्यामुळे या कार्यक्रमांनाही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या कार्यक्रमात आबाल वृद्धांसह, शेतकरी, शेत मंजूर, विद्यार्थी, तरूण, महिला आणि अधिकारी व कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावत आहेत. या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.