ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी घेतली उद्योगमंत्र्यांची भेट; इव्ही, शिक्षण, खनिकर्म क्षेत्रातील गुंतवणुकीवर चर्चा
मुंबई : भारतातील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त, वाणिज्यदूत आदींनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची आज शिवनेरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी द्विराष्ट्र संबध, औद्योगिक गुंतवणूक व शिक्षण क्षेत्रातील संधी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.शिष्टमंडळामध्ये ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बेरी ओ फॅरेल, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पीटर ट्रसवेल, आर्थिक सल्लागार ह्यू बॉयलन, जोयल अॅडसेट, तसनिम वाहनवटी यांचा समावेश होता.
महाराष्ट्र व ऑस्ट्रेलियामध्ये अनेक वर्षांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आगामी काळात हे संबंध अधिक वृद्धींगत करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. याशिवाय खनिकर्म, डेटा सेंटर्स, इलेक्ट्रिकल व्हेइकल, अन्न प्रक्रिया, भारतीय मसाल्याची निर्यात आदींवर चर्चा झाली.भारताने शिक्षणाविषयी नवीन धोरण आणले असून आगामी काळात ऑस्ट्रेलियातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांना आवश्यक सुविधा व सोयी पुरविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
आगामी काळात ऑस्ट्रेलियन सरकार भारतामध्ये पेन्शन फंड (निवृत्ती निधी) आणण्याच्या तयारीत असल्याचे उच्चायुक्त बेरी ओ फॅरेल यांनी स्पष्ट सांगितले.या वेळी उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नाईक आदी उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळातील मान्यवरांचा हिमरू शाल देऊन सत्कार केला.