महसूल विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक ऑनलाईन सुविधा देण्याचा प्रयत्न
– महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई : महसूल विभागाचे अधिकाधिक संगणकीकरण करून ऑनलाईन सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे पारदर्शकता, जलदता आणि अचुकता येत असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावर महसूल मंत्री थोरात बोलत होते. महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सातबाराचे संगणीकरण करण्यात आले असून या प्रक्रियेत काही दोष असल्यास ते दोष दूर करण्यात येणार आहे. मुद्रांक नोंदणीसाठी ई सरिता ही ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविडच्या काळात मुद्रांक शुल्कामध्ये दिलेल्या सवलतीमुळे महसूलात वाढ झाली असल्याचे थोरात पुढे म्हणाले.वाळू उपशासंदर्भात काही निर्णय घेण्यात आले. लिलाव प्रक्रियेचा कालखंड तीनवरून पाच वर्षापर्यंत वाढविण्यात आला असून लिलावाचे क्षेत्र पाच हेक्टरपर्यंत वाढविण्यात आले आहे. शासकीय कामासाठी घाट राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे थोरात म्हणाले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य परिणय फुके, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, विनायक मेटे आदी सदस्य सहभागी झाले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी आश्रय योजना – नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
बृहन्मुंबई महानगर पालिकेतील सफाई कामगारांसाठी आश्रय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 29 कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना तनपुरे बोलत होते. आश्रय योजनेंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचा-यांना घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. अत्यंत पारदर्शक पद्धतीने योग्य किमतीमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे तनपुरे म्हणाले.
मराठी शाळांच्या पटसंख्येत वाढ
बृहमुंबई महानगर पालिकेतील मराठी शाळांच्या पटसंख्येत 2021-22 मध्ये सुमारे एक हजाराने वाढ झाली आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वेगवेगळ्या सुविधा ह्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात गणवेश, बुट, पायमोजे, रेनकोट, छत्री, मध्यान्ह भोजन, सुसज्ज शालेय इमारतींचा समावेश आहे. व्हचर्युअल ट्रेनिंग सेंटरही महानगरपालिकेने सुरू केले आहे.
कोविड काळातील कामगिरीची जागतिक दखल
कोरोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्यंत चांगले काम केले. या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटना आणि सर्वोच्च न्यायालयानेही घेतली. आजाराचे स्वरूप माहिती नसल्यामुळे सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र, महानगरपालिकेने त्यावर मात करीत सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविल्या. प्रत्येक प्रभाग पातळीवर वॉर रूम स्थापन केली. खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. रुग्णाला उपचारासाठी लागणारा ऑक्सिजन हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला. यासाठीची निविदा प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे पार पाडल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
मुंबई कोस्टल रोडचे काम प्रगतीपथावर
मुंबई कोस्टल रोडचे काम हे प्रगतीपथावर आहे. कोविडचे संकट आणि न्यायालयांच्या काही निर्णयामुळे या प्रकल्पाला काही काळ विलंब झाला. मात्र, आता हे काम वेगाने सुरू आहे. जवळपास पन्नास टक्के काम या प्रकल्पाचे पूर्ण झाले आहे.
मिठी नदीच्या वहनक्षमतेत वाढ
मिठी नदीची वहन क्षमता वाढविण्याचे काम प्राधान्याने करण्यात आले. नदीची क्षमता दुपटीने वाढली आहे. नदीचे रुंदीकरण, गाळ काढणे, संरक्षण भिंत उभारणे ही कामे सुरू आहेत. भिंत उभारणीचे काम 80 टक्के काम पूर्ण झाले आहेत. तर इतर कामे 90 टक्के काम पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा पाण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे. एमएमआरडीए आणि बृहन्मुंबई महानगरपालिका मिळून यासाठी 1 हजार 250 कोटी रुपये खर्च झाला असल्याचे श्रो. तनपुरे म्हणाले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 25 ई वाचनालये
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2020-21 मध्ये 25 माध्यमिक शाळांमध्ये ई वाचनालये प्रायोगिक तत्वावर सुरू झाली आहेत. अद्यवायत अशा या 25 लायब्ररी असल्याचे श्री. तनपुरे म्हणाले.