मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली पूजा
मुंबई । सह्याद्री लाईव्ह । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली.
यावेळी मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासह कुटुंबातील सदस्य, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतानाच निर्भय, मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसेच पर्यावरणपूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.
आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुन:श्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.