विधानसभा लक्षवेधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील मौजे वरपगाव या पुनर्वसन करण्यात आलेल्या गावासाठीच्या सोयी-सुविधेकरिता प्रस्ताव मागवून आवश्यक निधी एका महिन्यात उपलब्ध करून देण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. मांजरा नदीची उपनदी बोभाटी नदीला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या बीड जिल्ह्यातील मौजे वरपगावचे विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यात आलेले आहे.
पुनर्वसित गावात एकूण ६६३ भूखंड पाडण्यात आले असून, सर्व लाभार्थ्यांना ६१७ प्लॉट वाटप करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीकडे ४६ प्लॉट देण्यात आलेले आहेत. तसेच गावात पहिली ते सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा, लाईट व पाण्याची सोय, ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत, अंगणवाडी इमारत आणि प्राथमिक आरोग्य उपविभागाची इमारत इत्यादी नागरी सुविधा देण्यात आल्या असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. मौजे वरपगावमध्ये ४०० ते ५०० मी. पर्यंतचे रस्त्यांचे काम झालेले आहे.
या गावासाठी अंतर्गत रस्ते व नाली बांधकामासाठी नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी यावेळी सांगितले. मांजरा प्रकल्पामुळे तसेच वैजापूर तालुक्यातील बाधित गावांना सुद्धा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माहिती घेऊन मार्ग काढू, असेही त्यांनी उपप्रश्नांच्या उत्तरात सांगितले. विधासभा सदस्य प्रकाश सोळंके यांनी यासंदर्भातील लक्षावेधी सूचना उपस्थित केली होती. सदस्य नमिता मुंदडा, रमेश बोरनारे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.