विधानसभा अध्यक्षपद निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घ्या
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान
पुणे – सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारला कंटाळले आहेत, हे नागपूर, अकोला, बुलढाणा आणि वाशिम येथे झालेल्या विधान परिषद निवडणुकीतून समोर आले. गुप्त मतदानाची संधी मिळताच आघाडीतील लोकप्रतिनिधीनींही भाजपला मतदान केले. त्यामुळे या चारही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत भाजप उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झाले. त्यामुळे हिंमत असेल, तर महाविकास आघाडीने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असे खुले आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिले.
विधान परिषद निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला, बुलढाणा, वाशिम मतदारसंघातून विजयी झालेले वसंत खंडेलवाल यांचे प्रदेशाध्य यांनी अभिनंदन केले. विधान परिषद निवडणुकीत यापूर्वीच भाजपाचे मुंबईतून राजहंस सिंह आणि धुळे नंदूरबार मतदारसंघातून अमरिश पटेल बिनविरोध विजयी झाले. पक्षाने एकूण सहापैकी चार जागा जिंकल्या आहेत. भाजपाला मुंबई आणि अकोला, बुलढाणा, वाशिम या जागा नव्याने मिळाल्या आहेत.
पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचा विकास होणार नाही याची लोकप्रतिनिधींना विशेषतः शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जाणीव आहे. त्यामुळे सदस्य म्हणून अपात्र ठरण्याच्या भीतीने ते पक्षासोबत राहत असले तरी गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भाजपला मतदान केले. आघाडीला आपल्याच आमदारांची खात्री नसल्याने नियम बदलून आवाजी मतदानाने निवडणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.’
…आणि अखेरीस पोरखेळ केला
भाजपने सहकार्य केल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही निवडणूकही बिनविरोध करावी असे ठरले होते व त्यासाठी आम्ही कोल्हापूरमध्ये उमेदवार मागे घेतला. पण, कॉंग्रेसने ठरल्याप्रमाणे पूर्ण सहकार्य केले नाही. त्या पक्षाने नागपूरच्या जागेवर निवडणुकीचा आग्रह धरला आणि अखेरीस पोरखेळ केला, अशी टीका पाटील यांनी कॉंग्रेसवर केली.