आकांक्षित जिल्हे देशासाठी गतीवर्धक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
विकासाच्या दऱ्या सांधण्यासाठी सांघिक प्रयत्न आवश्यक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ३० आश्रमशाळा तसेच एकलव्य शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सेंट्रल किचनमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याची विशेष दखल आज नीती आयोगाने केलेल्या सादरीकरणात घेण्यात आली व या उपक्रमाचा उत्तम संकल्पना (बेस्ट प्रॅक्टीस ) म्हणून गौरव देखील केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील काही आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. आकांक्षित जिल्हे हे विकासाच्या मार्गावर मार्गस्थ होतांना देशासाठी गतिरोधक नाही तर गतीवर्धक म्हणून काम करत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले. आकांक्षित जिल्ह्याना विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न नेटाने होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
आकांक्षित नसलेल्या पण विविध विकास निर्देशांकामध्ये एक किंवा दोन निर्देशांकात मागे असलेल्या देशातील १४२ जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारने केली असून या जिल्ह्यांच्या विकासाकडेही केंद्र शासन विशेष लक्ष देणार असून काही उद्दिष्टांची निश्चिती करत आहे. त्यांनी आकांक्षित जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करताना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांच्या आयुष्यातील चांगल्या बदलाचे साक्षीदार होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनास केले. प्रत्येक जिल्ह्याने पुढील दोन वर्षात स्वत:चे व्हिजन तयार करतांना तालुका पातळीवर जाऊन, तेथील प्राथमिकता विचारात घेऊन हे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.