घनसावंगी शासकीय आयटीआयमध्ये ४ नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : घनसावंगी (जि. जालना) येथील तालुकास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सन २०२२-२३ या वर्षापासून ४ नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली. नवीन तंत्रज्ञानावर आधारीत औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार या आयटीआयमध्ये रीमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट (पीपीए)/ड्रोन पायलट, स्मार्ट फोन टेक्निशियन कम ऍप टेस्टर, सोलर टेक्निशियन व मशिनिस्ट या ४ नवीन अभ्यासक्रमांच्या ५ तुकड्या सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री टोपे म्हणाले की, राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मोठा सहभाग आहे. जागतिक दर्जाचे व व्यवसायाभिमुख, आस्थापनांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मोठा वाटा आहे. आर्थिक उदारीकरणामुळे राज्यात औद्योगिकरण वेगाने वाढत आहे. औद्योगिक तंत्रज्ञान उत्पादनाच्या बदलत्या प्रक्रियेमुळे उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळाची गरज वाढत आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करणेही गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
घनसावंगी आयटीआयमध्ये आजमितीस ५ व्यवसायाच्या १० तुकड्या कार्यरत असून संस्थेत एकुण २१६ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. जालना जिल्हा औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असून स्टील कॅपीटल म्हणून ओळखला जातो. जालना जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करुन रोजगार निर्मिती करण्यासाठी घनसावंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भविष्यातील विकासाचा व आधुनिक जगाशी सुसंगत अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असलेल्या ०४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या नविन तुकड्या या संस्थेसाठी निवडण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने गरजू विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करुन रोजगार निर्मिती करण्यासाठी ज्यादा मागणीचे नवीन व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरु करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले.
रीमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट (पीपीए)/ड्रोन पायलट, स्मार्ट फोन टेक्निशियन कम ऍप टेस्टर आणि सोलर टेक्निशियन या ३ नव्या अभ्यासक्रमाची प्रत्येकी १ तुकडी तर मशिनिस्ट अभ्यासक्रमाच्या २ तुकड्या चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले.