जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या 571 कोटींच्या आराखड्यास मान्यता – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
• सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 164 कोटी 75 लाखाची अतिरिक्त मागणी करण्यात येणार • प्रत्येक शासकीय यंत्रणेने नियोजन समितीकडून सन 2021-22 चा मंजूर असलेला निधी माहे मार्च 2022 अखेर शंभर टक्के खर्च करावा - पालकमंत्री
सोलापूर : जिल्हा वार्षिक योजना सन 2022-2023 अंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी 415 कोटी 92 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेचे 151 कोटी तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेचे 4 कोटी 28 लाख असे एकूण 571 कोटी रुपयांच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत मान्यता प्रदान केली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, सोलापूर शहर आयुक्त हरिष बैजल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे व्यासपीठावर उपस्थित होते. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, प्रणिती शिंदे शहाजीबापू पाटील, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान अवताडे यांच्या सह इतर समितीसदस्य दुरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांनी 854 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाच्या मर्यादेनुसार जिल्हा नियोजन समितीने 415 कोटी 92 लाख रुपये, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत विविध शासकीय यंत्रणांनी 292 कोटीची मागणी केली होती त्यातील 151 कोटींच्या तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत 4 कोटी 28 लाख आशा एकूण 571 कोटीच्या सन 2022-23 जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास नियोजन समिती मान्यता देत असल्याचे समितीचे अध्यक्ष पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
सन 2022 23 साठी जिल्हयाच्या प्राधान्याच्या योजना लक्षात घेत सर्वसाधारण योजनेत 164 कोटी 75 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती भरणे यांनी यावेळी दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती योजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना यासाठी एकूण 625 कोटी रुपयांचा जिल्हा आराखडा होता.
कोविड च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनासमोर आर्थिक संकट असले तरी नियोजन समितीच्या निधीतून कपात करण्यात आलेली नाही. समितीला शंभर टक्के निधी प्राप्त झालेला आहे तरी सर्व शासकीय विभाग प्रमुख आणि जिल्हा नियोजन समितीकडून यावर्षीचा प्राप्त झालेला निधी विविध विकास कामावर शंभर टक्के खर्च झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश ही पालकमंत्री भरणे यांनी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियोजन समितीच्या आजच्या बैठकीतील विषय सर्व सदस्य यांच्यासमोर ठेवले. यामध्ये 25 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्तात मान्यता देणे. याच बैठकीतील इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल यास मान्यता देणे. जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 चा 31 डिसेंबर 2021 अखेर झालेला खर्चाचा आढावा घेणे व जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या एकूण प्रारुप आराखड्यास मान्यता देणे, या विषयांचा समावेश होता. जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी इतिवृत्त अनुपालन अहवाल 2021-22 व 22-23 च्या आराखड्यातील माहिती बैठकीत सादर केली.
या बैठकीस उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी व इतर समिती सदस्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताबाबत चिंता व्यक्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेणे, महापालिका हद्दीत ड्रेनेज मधील कामगारांचा मृत्यू बाबत, कोविड च्या काळात ग्रामीण भागात औषधींचा तुटवडा, अक्कलकोट येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पेमेंट बाबत, लसीकरणास सक्ती करू नये, तांडा सुधार योजना, सिद्धेश्वर यात्रा बाबतचे धोरण, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, कामगारांना संरक्षण साहित्य वाटप करणे बाबत व विविध विकास कामांसाठी निधी मिळण्याबाबत ची मागणी, समस्या व प्रश्न मांडून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
प्रारंभी राज्यातील हजारो अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सकपाळ यांचे निधन झाल्याबद्दल नियोजन समितीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांचा सन्मान
कोविड-19 या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रफिक शेख यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील–यड्रावकर, प्रधान सचिव प्रदीप व्यास व आरोग्य सेवा चे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र मिळाले असून ते प्रशस्तीपत्र आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व इतर अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.