जी-२० परिषदेसाठी सजतेय ‘आपली मुंबई’
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेले मुंबई शहर जी -20 परिषदेनिमित्त येणाऱ्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.
जी 20 परिषदेचे सन 2023 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्त महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे विविध बैठका होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध देशांचे प्रतिनिधी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. रात्रीच्या वेळेस लखलखणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात मरीन ड्राईव्ह परिसर उजळून निघतो. या भागात जी20 परिषदेनिमित्त येणाऱ्या प्रतिनिधींचे मुंबईत स्वागत आहे, अशा आशयाचे फलक दिसून येत आहेत.
‘वसुधैव कुटुंबकम’, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या आशयाचे घोषवाक्य लक्ष्य वेधून घेत आहेत. या फलकांवर मुंबई शहराची ओळख असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा गुंफा, फ्लोरा फाऊंटन, हॉटेल ताज, वांद्रे- वरळी सी लिंक, वारली चित्रशैलीची छायाचित्रे आकर्षक रंगसंगतीत दिसून येत आहेत.
याशिवाय भारत हा लोकशाहीची मातृभूमी असलेला देश आहे. जी 20 परिषदेचा यजमान देश, मोठी जबाबदारी – मोठी महत्त्वाकांक्षा अशी घोषवाक्यही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.