पुणे जिल्ह्यात आणखी 800 ‘आपले सरकार सेवा केंद्र’
पुणे – महा-ई सेवा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम केंद्र, महानगरपालिकेचे नागरी सुविधा केंद्र आणि सेतू केंद्र या सर्व केंद्रांना एकच नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ही सर्व केंद्र आता “आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने ओळखले जात आहे. शासनाने लोकसंख्येच्या प्रमाणात आपले सरकार केंद्रांची संख्या ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात शहरी, ग्रामीण आणि नगरपलिकेच्या हद्दीत आता आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या सुमारे 800 ने वाढणार आहे. पुढील काही महिन्यांत ही केंद्र सुरू केली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खासगी सेवा पोहोचविण्यासाठी नागरी सुविधा केंद्र योजना 2008 पासून सुरू करण्यात आली आहे. सध्यस्थितीत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने सेवा पुरविण्यासाठी महा-ई सेवा केंद्र, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालय येथील सेतू केंद्र, महानगरपालिकांनी स्थापन केलेली नागरी सुविधा केंद्र, तर ग्रामपंचायतींमध्ये संग्राम केंद्र सुरू आहेत.
केंद्र शासनाने नागरी सुविधा केंद्र योजनेंतर्गत राज्य शासनांना राज्याच्या सुविधा केंद्रांची स्वतंत्र ब्रॅंडिंग करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार शासनाने “आपले सरकार सेवा केंद्र’ हे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 46 टक्के लोकसंख्या ही शहरी भागात राहते. या शहरी लोकसंख्येच्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेली केंद्रांची संख्या ही फार कमी आहे. त्यामुळे शहरी भागातील लोकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सुविधा केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल. जर 2011 च्या जनगणेनुसार 5 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भागात किमान 2 केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तर महानगरपालिका व नगरपरिषदेमध्ये 10 हजार लोकसंख्येसाठी एक सेवा केंद्र यानुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.