लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जळगाव । सह्याद्री लाइव्ह । जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीजची लक्षणे आढळून येताच जनावरांना शासकीय पशुचिकित्सालयात आणावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पशु चिकित्सालयात आवश्यक पशु औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितले.
मंत्री विखे पाटील यांनी आज दुपारी मस्कावद, खिरोदा आणि फैजपूर येथे भेट देवून जनावरांवर झालेल्या लंपी स्कीन डीसिज बाधित गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पशुपालकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. व्ही. शिसोदे आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी सांगितले, लम्पी स्कीन डिसीज आजार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. या आजारामुळे मृत झालेल्या जनावरांचे पंचनामे करून नोंद ठेवावी. लम्पी स्कीन डिसीज वरील उपचाराची पद्धती निश्चित करून औषधोपचार करावेत.
लम्पी स्कीन डिसीजचा प्रसार होऊ नये म्हणून लसीकरण मोहीम अभियान स्तरावर राबवावी. तसेच पशुपालकांनी घ्यावयाची काळजी याविषयावर जनजागृती मोहीम राबवावी. सर्व पशुचिकित्सालयात आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी पशुपालकांशी संवाद साधला. त्यांनी लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांमधील लक्षणे, आतापर्यंत केलेले औषधोपचार याविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी लोकप्रतिनिधी, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.