सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात सभासदांमधून संताप
नोंदीच्या ऊस गाळपाचे आव्हान : गाळपासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट
सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अद्याप 11 लाख टन ऊस गाळपासाठी शिल्लक असल्याने कारखाना प्रशासनाने कार्यक्षेत्रातील तसेच बाहेरील कारखान्यांशी बोलणी सुरू केली. नोंदणी केलेला ऊस इतर कारखान्यांना देण्याचा उपदेश प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे ऊस टापूतील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. बिगर नोंदीच्या ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या दारात जावे लागणार आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची ससेहोलपट झाली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकारव्दारे ही माहिती दिल्यानंतर कार्यक्षेत्रातील शेतकरी संतापले आहेत. सध्या गाळपानुसार अकरा लाख गाळप करण्यास मे महिना उजाडणार आहे. त्यामुळे शेतकरी इतर कारखान्यांकडे पर्याय पाहण्यास सुरूवात केली आहे. कारखान्याकडे अकरा लाख टन ऊस गाळपासाठी असल्याने बिगर नोंदीचा आणि सभासदांच्या उसाला फटका बसतो की काय, याची चिंता सभासदांना लागली आहे. सहा महिन्यांपूर्वी सोमेश्वरची निवडणूक झाली. यात कारखान्यावर सभासदांनी विश्वासार्हतेची मोहोर उमटवली आहे.
परंतु प्रशासनाने हंगामात 3 लाख 39 हजार टनाचे गाळप पूर्ण केले आहे. सभासदांनी नोंदवलेल्या 11 लाख 20 हजार टन ऊसाचे गाळप बाकी आहे. गाळप वेळेत पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. ऊस वेळेत गाळपास जाण्यासाठी कार्यक्षेत्रालगतच्या बऱ्याच कारखान्याने अद्याप प्रतिसाद दिला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने बोलणी सुरु केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. मात्र, ही बोलणी आणि त्यासाठी लागणारा कालावधी याचा विचार केल्यास किमान पंधरा दिवस तरी जाण्याची शक्यता सभासदांमधून व्यक्त होत आहे.
अद्याप आडसाली, पूर्वहंगामी, सुरू, खोडवा आदींचे गाळप करण्याचे आव्हान जगताप यांच्यासमोर आहे. एकूण 36822 एकर नोंद ऊसक्षेत्रातून अंदाजे 14 लाख 60 हजार 559 टन ऊस उपलब्ध होईल. यापैकी कारखान्याने आजअखेर 3 लाख 40 हजार टनाचे गाळप पूर्ण केले आहे. सरासरी सर्वोच्च गाळप क्षमतेचा प्रयत्न केल्यास संपूर्ण गाळपास मेअखेरपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यामुळे खोडवा, निडवा आदींचे गाळप केव्हा होणार, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
आडसालीचे 12 हजार एकर गाळप शिल्लक
कारखान्याचे आडसाली हंगामाचे एकूण क्षेत्र 12240 एकर शिल्लक आहे. यातून अंदाजे 575000 टन ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सभासदांना बाहेरील कारखान्यास नोंदवलेला ऊस गाळपास द्यावयाचा असल्यास त्यास कारखान्याची परवानगी घेऊन बाहेर गाळ्पास पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आडसाली ऊस उत्पादक शेतकरी संतापला आहे. जर आडसाली ऊस 12 हजार एकर शिल्लक असल्याने पूर्व, सुरू हंगामातील ऊस गाळप केव्हा होणार, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सभासदांना इतर कारखान्यांना ऊस देण्याचा सल्ला देऊन प्रशासनाने सभासदांचा रोष ओढवून घेतला आहे.